मंत्रालयामधून एसीबीने झिरवाळांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात; तक्रारदाराच्या समोरच केली तपासणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मंत्रालयात अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्यानंतर त्या प्रकरणातील ठोस पुरावे मिळवण्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (एसीबी) धडपड सुरू आहे. आज एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील कंट्रोल रूममध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेज जमा केले.

तक्रारदार हरिराम घांची यांच्यासह एसीबीचे पाच ते सहा अधिकारी आज कंट्रोल रूममध्ये पोहोचले. त्यांनी फुटेजची तपासणी करत असतानाच घांची यांचा जबाब नोंदवला. राजेंद्र ढेरंगे याचा लाच मागतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी कार्यालयात कोण-कोण उपस्थित होते त्याची सविस्तर माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. ढेरंगे याचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला असून त्यातील डाटाही मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

झिरवाळांच्या खासगी सचिवाची बदली

नरहरी झिरवाळ यांचे खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त करून मूळ विभागात त्यांची बदली करण्याचे निर्देश आज देण्यात आले. गाडे मंत्रालयातील कृषी व पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागात सहाय्यक आयुक्त आहेत. ते प्रतिनियुक्तीवर झिरवाळ यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहत होते.

लाचखोर कारकून राजेंद्र ढेरंगेला जामीन मंजूर

लिपिक राजेंद्र ढेरंगे याला मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. ढेरंगेची न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली. ढेरंगे हा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून, गेल्या वर्षीच तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत होता.

Comments are closed.