भिवंडीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचा बंडखोर बनला महापौर; करावे तसे भरावे… सहा नगरसेवक फुटले, कमळाबाईला जोर का झटका
सत्तेसाठी पक्षफोड्या कमळाबाईला भिवंडीत काँग्रेसने आज जोर का झटका दिला. महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे 6 नगरसेवक फुटले. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी महापौर झाले, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन विजयी झाले. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे नगरसेवक पह्डणाऱ्या भाजपला भिवंडीत ‘करावे तसे भरावे’ याची प्रचीती आली. महापौर निवडणुकीत शिंदे गटालाही धक्का बसला असून त्यांनी पाठिंबा दिलेल्या कोणार्क विकास आघाडीचा धुव्वा उडाला.
ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली महापौर निवडीची सभा झाली. 90 नगरसेवकांच्या सभागृहात सत्ता स्थापनेसाठी 46 मॅजिक फिगर होती. महापौर निवडणुकीसाठी काँग्रेसप्रणीत सेक्युलर फ्रंटचे उमेदवार भाजप बंडखोर नारायण चौधरी, कोणार्क आघाडीचे विलास पाटील आणि भाजपच्या स्नेहा पाटील यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. यामध्ये नारायण चौधरी 48 मते मिळवून विजयी झाले. भाजपच्या स्नेहा पाटील यांना अवघी 16 मते मिळाली, तर कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना 25 मते मिळाली. तर उपमहापौर निवडणुकीत काँग्रेसचे तारिक मोमीन 43 मते मिळवून विजयी झाले. भाजपचे सुहास नकाते यांना 21, तर भिवंडी विकास आघाडीच्या जावेद दळवी यांना 25 मते मिळाली. सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून भिवंडी पालिकेतील सत्तेपासून भाजपला रोखण्याची काँग्रेसची खेळी यशस्वी झाली.
एकाधिकारशाहीविरोधात खदखद
भाजपने नगरसेवक नारायण चौधरी यांना महापौर पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नारायण चौधरी यांच्याऐवजी महापौर पदाच्या उमेदवार म्हणून स्नेहा पाटील यांच्या नावाची घोषणा केली. नगरसेवकांना विश्वासात न घेता महापौर पदाची उमेदवारी बदलल्याने पक्षातील एकाधिकारशाही विरोधातील खदखद बाहेर आली. चौधरी यांच्यासह 6 नगरसेवकांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन करून काँग्रेसच्या सेक्युलर फ्रंटसोबत घरोबा करत भाजपला जशास तसे उत्तर दिले.
बंडखोरांवर कारवाई करणार – रवींद्र चव्हाण
भिवंडी महापौर, उपमहापौर निवडणुकीतील लाजिरवाणा पराभव रवींद्र चव्हाण यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. बंडखोरी न करण्याबाबत समजावूनही काही नगरसेवक फुटले. त्यामुळे आता ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.
भाजपच्या उपमहापौर उमेदवाराचेही विरोधात मतदान
भाजपच्या बंडखोर नगरसेवकांमध्ये नारायण चौधरी यांच्यासह अबूसाद शेख, दीपा मढवी, अश्विनी फुटाणकर, सुहास नकाते, नंदिनी गायकवाड यांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भाजपचे उपमहापौर पदाचे उमेदवार सुहास नकाते यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील यांच्याऐवजी फुटीर नारायण चौधरी यांना मतदान केले. सभागृहात हात वर करून चौधरी यांच्या बाजूने त्यांनी मतदान करताच सर्वजण अवाक झाले.
शिंदे गटाला धक्का
राज्यातील सत्तेतील भागीदार शिंदे गटाने भाजपला शह देण्यासाठी महापौर, उपमहापौर निवडणुकीत स्थानिक आघाडय़ांना पाठिंबा दिला. महापौर निवडणुकीत शिंदे गटाच्या नगरसेवकांनी कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना, तर उपमहापौर निवडणुकीत भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांना मतदान केले. मात्र दोन्ही उमेदवारांचा पराभव झाल्याने भाजपसोबतच शिंदे गटालाही जोरदार धक्का बसला.
Comments are closed.