डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे

गोर यांच्याकडून सुतोवाच, आधी रुबिओ यांची भेट

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताचा दौरा करण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी याचे सुतोवाच केले आहे. मात्र, ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांचा भारत दौरा लवकरच होणार आहे, असेही गोर यांनी स्पष्ट केले. भारतात ‘क्वाड’ची परिषद होणार आहे. या परिषदेसाठी रुबिओ येतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

रुबिओ यांच्या या संभाव्य भारत दौऱ्यात ‘क्वाड’ प्रमाणेच अन्य महत्वपूर्ण विषयांवरही चर्चा केली जाईल. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध, भारत-प्रशांतीय क्षेत्रातील परिस्थिती, गुंतवणूक, व्यापार आणि द्विपक्षीय तसेच आंतरराष्ट्रीय विषयांवर ते भारताशी चर्चा करतील. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट ते घेतील, अशीही महत्वपूर्ण माहिती मार्को रुबिओ यांनी दिली.

‘क्वाड’ अद्यापही कार्यरत

भारत-प्रशांतीय क्षेत्राची सुरक्षितता आणि वाहतूक स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ‘क्वाड’ ही संघटना आजही कार्यरत आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी आल्यानंतर या संघटनेकडे अमेरिकेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात होता. तसेच ही संघटना आता निष्क्रीय झाल्याचे बोलले जात होते. तथापि, भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी म्युनिच सुरक्षा परिषदेत बोलताना ही संघटना कार्यरत असल्याचे स्पष्ट केले होते. या संघटनेची शिखर परिषद गेल्या वर्षभरात झालेली नाही. मात्र, याचा अर्थ ही संघटना गुंडाळण्यात आली आहे, किंवा ती निष्क्रीय झाली आहे, असा होत नाही संघटना महत्त्वाची असून तिचे कार्य होत आहे. या संघटनेच्या अंतर्गत काम करणारे अनेक गट आणि संस्थात्मक यंत्रणा कार्यरत आहेत. त्यामुळे ही संघटना तिच्या ध्येयाच्या पूर्तीसाठी सक्षमपणे कार्यरत आहे. तिच्या कामाविषयी कोणीही शंका घेऊ नयेत, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता सर्जियो गोर यांनी रुबिओ यांचा भारत दौरा होणार असल्याची माहिती दिली.

रशियाच्या तेलाविषयी…

रशियाकडून कच्चे इंधन तेल विकत घेऊ नये, ही अमेरिकेची भूमिका केवळ भारतावर दबाव आणण्यासाठी योजिलेली नाही. ती अमेरिकेच्या व्यापक, शांततावादी आणि जागतिक राजकारणाचा भाग आहे. केवळ भारतच, नव्हे, तर जोपर्यंत रशिया युक्रेनशी युद्ध थांबवत नाही, तोपर्यंत रशियाचे तेल कोणीही घेऊ नये, असेच अमेरिकेचे म्हणणे आहे. रशियाला आथिकदृष्ट्या एकटे पाडल्याशिवाय हे युद्ध थांबणार नाही, ही अमेरिकेची वर्षभरापासूनची भूमिका आहे. ती केवळ भारताच्या चौकटीत पाहिली जाऊ नये, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे.

Comments are closed.