एआय परिषदेत युवक काँग्रेसचा निषेध
‘भारत मंडपम’मध्ये गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक : भाजपची जोरदार टीका, राजकारण पेटणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेदरम्यान शुक्रवारी युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिंसक निदर्शने केली. या आंदोलनप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अनेक निदर्शकांना ताब्यात घेतले. निदर्शनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते त्यांचे शर्ट काढून घोषणाबाजी करताना दिसले. एआय समिटमध्ये निषेध केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, काँग्रेसने केलेल्या या आंदोलनप्रकरणी भाजपने जोरदार टीका केल्यानंतर राजकीय वातावरण तप्त झाले आहे. त्याचबरोबर आता दिल्ली भाजप कार्यकर्त्यांकडून शनिवारी सकाळी 10 वाजता काँग्रेस मुख्यालयासमोर निषेध आंदोलन केले जाणार आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराच्या विरोधात तीव्र निदर्शने करणारे काँग्रेस कार्यकर्ते भारत मंडपम येथील विविध मंडपांमध्ये घुसल्यानंतर बराच गोंधळ दिसून आला. अधिकाऱ्यांच्या मते, अनेक युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे शर्ट काढून टाकत पंतप्रधानांविरोधात घोषणा दिल्या. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत सर्वांना ताब्यात घेण्यात आले. सरकारी अधिकारी, उद्योजक आणि परदेशी प्रतिनिधी उपस्थित असलेल्या या हाय-प्रोफाइल आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात निदर्शक घुसल्यामुळे त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन कार्यक्रमस्थळापासून दूर नेण्यात आले.
राष्ट्राच्या अस्मितेशी तडजोड नाही : भारतीय युवक काँग्रेस
दरम्यान, भारतीय युवा काँग्रेसने सोशल मीडियावरील एका पोस्ट करत आपले म्हणणे व्यक्त केले. ‘जेव्हा पक्षपात, कॉर्पोरेट दबाव आणि मौन परराष्ट्र धोरणावर वर्चस्व गाजवते… तेव्हा हे स्पष्ट होते की पंतप्रधान मोदी तडजोड करत आहेत!’ हे सत्य उघड करण्यासाठी भारतीय युवा काँग्रेसच्या धाडसी कार्यकर्त्यांनी एआय समिटमध्ये पोहोचून ‘तडजोड केलेल्या पंतप्रधानांविरुद्ध’ निषेध केला! देशाच्या अस्मितेशी कोणतीही तडजोड नाही! क्रांती अमर रहे! असा संदेश जारी केला आहे.
भाजपने संबोधले देशविरोधी कृत्य
भारतीय युवा काँग्रेसच्या निषेधावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींच्या इशाऱ्यावर, काँग्रेस कार्यकर्ते एआय समिटमध्ये पोहोचल्याचा आरोप केला. या आंदोलनावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या. देशविरोधी हेतू आणि धोरणे असलेला पक्षच असे करू शकतो. जेव्हा जेव्हा भारताचा आदर केला जातो आणि देश प्रगती करतो तेव्हा राहुल गांधी आणि वड्रा कुटुंब चिडते. म्हणूनच ते स्वत:च्या राजकीय हितासाठी भारताचा अपमान करणारे कृत्य करतात, अशी टीका भंडारी यांनी केली. तसेच राहुल गांधी आणि काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.
या निषेधावर प्रतिक्रिया देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसला धारेवर धरले. काँग्रेसने पुन्हा एकदा आपण ‘एआय’विरोधी असल्याचे दाखवून दिले आहे. ही काँग्रेस ‘देशविरोधी काँग्रेस’ आहे. एआय शिखर परिषदेचे जगभरात कौतुक होत आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनपासून ते संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांपर्यंत, टॉप टेक कंपन्यांच्या मालकांपर्यंत, सॅम ऑल्टमनपासून सुंदर पिचाईपर्यंत, सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. शशी थरूर यांनीही एआय शिखर परिषदेला उत्कृष्ट म्हटले. पण काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या इशाऱ्यावर निषेध करत आहे. हा चारित्र्यहीन, बुद्धीहीन आणि भावनाहीन निषेध आहे. काँग्रेसने केलेली निदर्शने ही भाजपचा निषेध नाही, हा पंतप्रधानांचा निषेध नाही, हा भारताच्या कामगिरीचा निषेध आहे, असेही पूनावाला म्हणाले.
Comments are closed.