भारतानेही 'पॅक्स सिलिका'वर स्वाक्षरी केली.

अमेरिकेच्या एआय, दुर्मीळ धातू पुढाकारात सहयोग : ‘पॅक्स सिलीका’त अनेक प्रगत देशांचा सहभाग

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि दुर्मीळ धातू पुरवठा साखळी सुरक्षितता यांच्यासाठीच्या घोषणापत्रावर भारतानेही स्वाक्षरी केली आहे. हे घोषणापत्र अमेरिकेच्या पुढाकाराने अस्तित्वात आले आहे. अमेरिकेने या घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी अन्य अनेक महत्त्वपूर्ण देशांसमवेत भारतालाही आमंत्रित केले. या आमंत्रणाचा त्वरित स्वीकार करून भारताने आता त्यावर स्वाक्षरी केली आहे.

नवी दिल्ली येथे सध्या महत्वपूर्ण ‘जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव’ परिषद होत आहे. याच परिषदेत भारताने या घोषणापत्रावर शुक्रवारी स्वाक्षरी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान किंवा एआय आणि दुर्मीळ धातू यांच्यावरच अत्याधुनिक तंत्रविज्ञानाची प्रगती अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या पुरवठा साखळ्या सुरक्षित रहाव्यात आणि त्यांच्यावर कोणत्याही एका देशाचा एकाधिकार किंवा निर्णायक वर्चस्व राहू नये, या उद्देशाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने हे घोषणापत्र साकारण्यात आले आहे. आता या अभियानात भारतही सहभागी आहे.

भारताला होणार मोठा लाभ

भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या वतीने या घोषणापत्रावर स्वाक्षरी केली आहे. भारत आता ‘पॅक्स सिलीका’ या घोषणापत्राचा एक भाग झाला आहे. या सहभागाचा भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उद्योगाला मोठा लाभ होणार आहे. भारतात आज दहा इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्रे स्थापित झाली आहेत. त्याहीपेक्षा अधिक केंद्रे स्थापित होण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच भारताच्या प्रथम सेमीकंडक्टर उत्पादन केंद्रातून उत्पादनाला प्रारंभ होणार आहे. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उद्योगाची एक संपूर्ण ‘इकोसिस्टिम’ भारत विकसित करत आहे. या घोषणापत्रातील भारताचा सहभाग या विकासासाठी निर्णायकरित्या साहाय्यभूत ठरणार आहे,’ असे वक्तव्य अश्विनी वैष्णव यांनी ‘पॅक्स सिलीका’ घोषणापत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर केले आहे.

डिसेंबरमध्ये प्रारंभ

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने ‘पॅक्स सिलीका’ घोषणापत्राचा प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, इस्रायल, जपान, कतार, दक्षिण कोरिया, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात आणि ब्रिटन या देशांचा समावेश करण्यात आला. नंतर भारतासह अन्य काही देशांना आमंत्रित करण्यात आले. भारताचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत अमेरिकेनेही व्यक्त केले आहे. भारतात दुर्मीळ धातूंचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे साठे आहेत. त्यामुळे या धातूंच्या पुरवठा साखळ्यांमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

भारताला कोणते लाभ…

भारताकडे दुर्मीळ धातूंचे मोठे साठे आहेत. तसेच भारताकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इलेक्ट्रॉनिक्स संशोधनाकरिता आवश्यक असणाऱ्या प्रतिभावंत युवकांची संख्याही खूप मोठी आहे. ‘पॅक्स सिलीका’त सहभागी झाल्याने भारताला आपली बौद्धिक प्रतिभा आणि दुर्मीळ धातूंचे अप्रकाशित स्रोत यांचा उपयोग करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे. इतर प्रगत देशांनी या धातूंच्या संदर्भात जे संशोधन केले आहे, त्याला भारतालाही लाभ होण्याची शक्यता आहे. भारतानेही आता दुर्मीळ धातूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास प्रारंभ केला आहे. त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञानही भारताने विकसित केले आहे. त्यामुळे भारत पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका साकारू शकतो. इलेक्ट्रॉनिक आणि सेमीकंडक्टर उत्पादनांचे जागतिक केंद्र बनण्याचे भारताचे ध्येय आहे. या ध्येयाच्या पूर्तीसाठी हे घोषणापत्र भारताला लाभदायक आणि आधारभूत ठरू शकते. त्यामुळे भारताने या घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्याचा योग्य निर्णय घेतला आहे, असा मतप्रवाह आहे.

जेकब हेलबर्ग यांची संकल्पना

अमेरिकेचे अर्थमंत्री जेकब हेलबर्ग यांनी ‘पॅक्स सिलीका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे, असे बोलले जाते. सध्या दुर्मीळ धातूंच्या पुरवठ्यावर चीनचा एकाधिकार आहे. जगातील 70 ते 80 टक्के पुरवठा एकट्या चीनकडून केला जातो. चीनचे हे वर्चस्व अनेक देशांना जाचक ठरत आहे. हे वर्चस्व कमी करण्यासाठी हेलबर्ग यांनी ही संकल्पना साकारली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ती उचलून धरल्याने हे घोषणापत्र अस्तित्वात आले आहे. जगाचे चीनवरील अवलंबित्व कमी करणे, दुर्मीळ धातू आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान यांच्या जागतिक पुरवठा साखळ्या संरक्षित आणि सुनिश्चित करणे आणि त्यायोगे आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे, ही या घोषणापत्राची प्रमुख उद्दिष्ट्यो आहेत.

‘पॅक्स सिलीका’चे भारताला अनेक लाभ

ड भारतात इलेक्ट्रॉनिक उद्योगाची वाढ होण्यास ‘पॅक्स सिलीका’चे साहाय्य

ड दुर्मीळ धातूंच्या जागतिक पुरवठा साखळीत भारताची भूमिका महत्त्वाची

ड भारतात दुर्मीळ धातूंचे मोठे अप्रकाशित साठे, जगात आहे तिसरा क्रमांक

 

Comments are closed.