पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशिदीसाठी मार्ग मोकळा

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बाबर किंवा बाबरी मशिदीच्या नावावर कुठल्याही नव्या मशिदीची निर्मिती किंवा नामकरणाला बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली आहे. न्यायाधीश विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळत याप्रकरणी कुठलाही हस्तक्षेप करण्यास नकार दिला. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात ‘बाबरी मशिद’ नावाने एक नव्या प्रार्थनास्थळाच्या निर्मितीवर वाद निर्माण झाला असताना हा निर्णय देण्यात आला आहे.

मुघल शासक बाबरला हिंदूविरोधी शासक मानले जाते, यामुळे त्याच्या नावावर कुठलीही मशीद निर्माण केली जाऊ नये असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला होता. याचिकेत विशेष स्वरुपात मुर्शिदाबाद येथील निर्माणाधीन मशिदीचा उल्लेख करण्यात आला होता. तेथे आमदार हुमायूं कबीर यांच्याकडून ‘बाबरी मशीद’ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. देशभरात बाबर किंवा बाबरी मशिदीच्या नावावर कुठलेही प्रार्थनास्थळ किंवा नामकरण होऊ न देण्याचा निर्देश केंद्र आणि राज्य सरकारांना द्यावा अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.

 

 

Comments are closed.