उरणच्या ओएनजीसीमध्ये पुन्हा आग; गॅस लाईनची दुरुस्ती सुरू असतानाच दुर्घटना, सुदैवाने जीवितहानी टळली
ओएनजीसी प्रकल्पात गॅस लाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी मोजकेच कामगार कामावर होते. पण त्यांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने प्राणहानी टळली असली तरी वारंवार अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशा घटनांमुळे ओएनजीसी प्रकल्पातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
आज सकाळी ओएनजीसी प्रकल्पामधील गॅस वाहिनीच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू असतानाच सकाळी ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काम करीत असलेल्या कामगारांनी प्रसंगावधान राखून आगीची माहिती कंट्रोल रूमला दिली. कंट्रोल रूममधील अधिकाऱ्यांनी तत्काळ ओएनजीसीच्या अग्निशमन दलाला कळवले. आगीची माहिती मिळताच ओएनजीसी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला.
- ओएनजीसी प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे कामगार, परिसरातील नागरिक चिंतेत आहेत. यापूर्वी ३१ जानेवारी २०२२, १० सप्टेंबर २०२३ या दिवशी आगीचा भडका उडाला होता.
- नवखे कामगार, अनुभवी कामगारांची कमतरता आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळेच प्रकल्पात वारंवार आगीच्या घटना घडत असल्याचा गंभीर आरोप कामगारांकडून केला जात आहे. सुरक्षेच्या उपाययोजना आणखी वाढवाव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे.
आग किरकोळ तरी दुर्लक्ष नको
आज लागलेल्या आगीची घटना किरकोळ असली तरी त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये अशी अपेक्षा कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे. आजच्या घटनेत कोणत्याही प्रकारचा स्फोट झाला नाही. तसेच कसलेही नुकसान झाले नसल्याचा दावा ओएनजीसी जनसंपर्क अधिकारी उमंग पांडे यांनी केला आहे. ३ सप्टेंबर २०१९ रोजी ओनएजजीसी प्रकल्पात लागलेल्या भीषण आगीत चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
Comments are closed.