विनोद जाखड हे एनएसयूआयचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

वरुण चौधरी यांची जागा घेणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेस पक्षाने शुक्रवारी विनोद जाखड यांची राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे (एनएसयूआय) नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाखड यांची तात्काळ प्रभावाने एनएसयूआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. जाखड यांनी वरुण चौधरी यांची जागा घेतली आहे. अलिकडेच, काँग्रेस नेतृत्वाने एनएसयूआय अध्यक्षपदासाठी अनेक दावेदारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आतापर्यंत विनोद जाखड यांनी एनएसयूआयच्या राजस्थान युनिटचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तसेच त्यांनी राजस्थान विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.

सचिन पायलट यांचे निकटवर्तीय तरुण नेते म्हणून विनोद जाखड ओळखले जातात. राजस्थानातील जयपूर जिह्याजवळील विराटनगर तालुक्यातील मेढ गावात 7 सप्टेंबर 1994 रोजी जन्मलेले जाखड हे एका सामान्य दलित कुटुंबातील आहेत. चार भावंडांमध्ये सर्वात मोठे असलेले विनोद हे वयाच्या सातव्या वर्षी आपल्या कुटुंबासह जयपूरला आले. त्यांनी राज्यशास्त्रात बीए केल्यानंतर 2017 मध्ये त्यांनी समाजशास्त्रात एमए केले. सध्या ते राजस्थानी भाषेत एमए करत आहेत. अभ्यासासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत आवाज उठवत एनएसयूआयचे सक्रिय सदस्य म्हणून काम केले. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांना राजस्थानमधील एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

Comments are closed.