अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांची आसने रिक्तच राहणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीची शिफारस पत्रे विधिमंडळाला देण्यात आली आहेत, पण यावर विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापतींकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या 23 तारखेपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेत्यांची आसने रिक्तच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सर्वसाधारणपणे पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड होते, मात्र विरोधी बाकावरील सर्वात मोठय़ा पक्षाच्या सदस्यांची संख्या ही एकूण विधानसभा सदस्य संख्येच्या 10 टक्के इतकी नसल्याचे कारण पुढे करीत विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्यापपर्यंत प्रलंबित ठेवला आहे. विधानसभेप्रमाणे विधान परिषदेतही हेच चित्र आहे.

राज्य विधिमंडळाच्या गेल्या वर्षीच्या नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींच्या अखत्यारीतील असल्याचे सांगितले होते. त्यांनी घेतलेला निर्णय सरकारला मान्य असेल. विरोधी पक्षनेते पदाबाबत सरकारचा कोणताही दुराग्रह नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाबाबत ‘योग्य वेळी’ निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका घेतली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र शिवसेनेच्या वतीने 4 मार्च 2025 रोजीच देण्यात आले. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची  विधान परिषद सदस्यत्वाची मुदत गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये संपली. त्यामुळे काँग्रेसने विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना डिसेंबर 2025 च्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या निवडीचे पत्र दिले होते. विरोधी पक्षाच्या या दोन्ही पत्रांवर अजून कार्यवाही झालेली नाही.

सदस्य संख्येची अटच नाही

विरोधी पक्षनेता निवडीसाठी कायद्यातील तरतुदींच्या संदर्भात याची माहिती घेण्यासाठी भास्कर जाधव यांनी विधिमंडळ सचिवालयाला पत्र दिले होते. त्यावर विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी कायद्यात सदस्य संख्येची अट नाही असे स्पष्ट उत्तर विधिमंडळाने भास्कर जाधव यांना दिले आहे, पण तरीही दहा टक्के सदस्य संख्येची अट दाखवून विरोधी पक्षनेते पद दिलेले नाही.

डिसेंबरच्या पत्रावर अजून निर्णय नाही

यासंदर्भात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील म्हणाले की, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेसने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सभापतींना पत्र दिले होते. या पत्रावर कार्यवाही होत नसल्याने आम्ही विरोधी पक्षनेता निवडीची मागणी लावून न धरण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments are closed.