Nanded crime news – भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा खून; तिघांना अटक, मयताच्या नातेवाईकांकडून आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न
अर्धापूर शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरात भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा खून झाला असून या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात चार जणा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास झाली असून घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली होती. मयत तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न केले. तसेच दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात चांदु दिगंबर वाघमारे यांचे घर आहे. त्यांचे शेजाऱ्यांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता आणि याचे रुपांतर तुंबळ भांडणात झाले. हे भांडण सोडवायला त्यांचा मुलगा व्यंकटी चांदु वाघमारे (वय – 25) हा गेले असता संशयित आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी गुप्तांगावर मारहाण करून रस्त्यावरील दुभाजकावर आपटुन जीवे मारले, अशी फिर्याद मयताच्या पत्नीने दिली. त्यावरून मधु तांदुळकर, गणेश तांदुळकर, मारोती तांदुळकर, लता तांदुळकर यांच्याविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस सहाय्यक निरीक्षक विष्णू कराळे, चित्तरंजन ढेमकेवाड जमादार विजय आडे, महेंद्र डांगे यांनी घटनास्थळी भेट दिली व परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी आरोपींचे घर जाळण्याचा प्रयत्न केले व तसेच दुचाकीची तोडफोड केली.
मयताच्या नातेवाईकाचा आक्रोश
मयत व्यंकटी चांदु वाघमारे हा तरूण घरात जेवण करत होता. बाहेर रस्त्यावर भांडण सुरू आहे हे कळताच तो बाहेर आला व भांडण सोडविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यालाच बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
Comments are closed.