बॅटने तिलक तर बॉलने अर्शदीप गाजवणार मैदान! आफ्रिकेविरुद्ध कोण आहे ‘टॉप परफॉर्मर’?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ मधील थरारक सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे, ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ अजिंक्य राहिले आहेत, त्यामुळे रविवारचा हा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे. जर दोन्ही देशांमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांचा विचार केला, तर डेव्हिड मिलर अव्वल स्थानी आहे, तर भारताकडून टिळक वर्मा ‘टॉप परफॉर्मर’ आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यांमध्ये डेव्हिड मिलर हा ‘लीडिंग रन-स्कोअरर’ आहे. मिलरने २८ सामन्यांच्या २५ डावांमध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांच्या मदतीने १४६.२३ च्या स्ट्राइक रेटने ५६३ धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डेकॉक आहे. डिकॉकने १५ सामन्यांच्या १४ डावांमध्ये ६ अर्धशतकांच्या जोरावर १४९.५५ च्या स्ट्राइक रेटने ५०७ धावा केल्या आहेत. हे दोन्ही खेळाडू सध्याच्या दक्षिण आफ्रिकी संघाचा भाग आहेत आणि रविवारी भारतीय संघासमोर मोठे आव्हान उभे करू शकतात.
सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर टिळक वर्मा आहे. तिलकने १० सामन्यांच्या १० डावांमध्ये २ शतके आणि २ अर्धशतके झळकावत १६३.१५ च्या स्ट्राइक रेटने ४९६ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १८ सामन्यांच्या १७ डावांमध्ये १ शतक आणि २ अर्धशतकांसह ४२९ धावा केल्या आहेत; तो दोन्ही देशांमधील चौथा सर्वोत्तम स्कोअरर आहे. पाचव्या क्रमांकावर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आहे. सूर्याने १५ सामन्यांच्या १४ डावांमध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने ४०६ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने आता निवृत्ती घेतली आहे, परंतु तिलक आणि सूर्यकुमार यादव संघाचा महत्त्वाचा भाग आहेत. भारतीय संघ व्यवस्थापनाला या दोघांकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल.
सध्याच्या भारतीय संघात असलेल्या हार्दिक पांड्या, संजू सॅमसन आणि ईशान किशन यांची कामगिरी देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली राहिली आहे. सॅमसनने तर या संघाविरुद्ध २ शतकेही ठोकली आहेत. आता संघ व्यवस्थापन अभिषेक शर्माला डच्चू देऊन त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
गोलंदाजीचा विचार केला तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामन्यांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स अर्शदीप सिंगने घेतल्या आहेत. अर्शदीपने १४ सामन्यांत २३ बळी टिपले आहेत. २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात अर्शदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल. दुसरा यशस्वी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आहे, ज्याने ८ सामन्यांत २२ विकेट्स घेतल्या आहेत.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर लुंगी एन्गिडी आहे, ज्याने भारताच्या विरोधात ९ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या आहेत. केशव महाराज चौथ्या क्रमांकावर असून त्याने १६ सामन्यांत १५ बळी घेतले आहेत. भुवनेश्वर कुमारने १२ सामन्यांत १४, हार्दिक पांड्याने २० सामन्यांत १३ आणि अक्षर पटेलने १८ सामन्यांत १७ विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमार वगळता इतर सर्व गोलंदाज सध्याच्या भारतीय संघाचा भाग आहेत.
Comments are closed.