सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी सुपर-8 मध्ये किती विजय आवश्यक? काय आहे टी20 वर्ल्ड कपचं नवं समीकरण

टी-२० वर्ल्ड कप २०२६ आता त्याच्या पुढच्या टप्प्यात म्हणजेच सुपर-८ मध्ये पोहोचला आहे. स्पर्धेतील ग्रुप स्टेजचे सामने पूर्ण झाले असून, त्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांनी सुपर-८ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या टप्प्यात संघांना दोन गटांत विभागण्यात आले आहे. सुपर-८ मध्ये हे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी झुंज देतील.
दोन गटांमध्ये प्रत्येकी ४-४ संघांची विभागणी करण्यात आली असून, सर्व संघांना सेमीफायनलपूर्वी ३-३ सामने खेळायचे आहेत. गटातील प्रत्येक संघ इतर संघांविरुद्ध मुकाबला करेल. आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, सुपर-८ मध्ये नक्की किती सामने जिंकल्यानंतर संघ सेमीफायनलमध्ये जागा मिळवू शकतील? चला तर मग, सुपर-८ पासून सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याचे संपूर्ण समीकरण समजून घेऊया.
जर एखादा संघ सुपर-८ मधील तिन्ही सामने जिंकला, तर त्याचे सेमीफायनलमधील स्थान पूर्णपणे निश्चित होईल.
तसेच, संघ तीनपैकी दोन सामने जिंकूनही सेमीफायनलचे तिकीट मिळवू शकतात, परंतु अशा परिस्थितीत संघाचा ‘नेट रनरेट’ अत्यंत महत्त्वाचा ठरेल. याशिवाय, इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल.
जर एखाद्या संघाने सुपर-८ मध्ये फक्त एकाच सामन्यात विजय मिळवला, तर तो संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर (एलिमिनेट) होईल.
सुपर-८ मधील दोन्ही गटांतील ‘टॉप-२’ संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. आता कोणते संघ सेमीफायनलमध्ये जागा मिळवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विशेष म्हणजे, पहिला सेमीफायनल सामना ४ मार्च रोजी आणि दुसरा सेमीफायनल सामना ५ मार्च रोजी खेळवला जाईल.
उल्लेखनीय आहे की, झिम्बाब्वेने पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर-८ मध्ये प्रवेश केला आहे. सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेने ग्रुप स्टेजमधील सर्व सामने जिंकून पुढच्या टप्प्यात पाऊल ठेवले. झिम्बाब्वेने तीन सामन्यांमध्ये ओमानविरुद्ध ८ विकेट्सनी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३ धावांनी आणि श्रीलंकेविरुद्ध ६ विकेट्सनी विजय नोंदवला. त्यांचा आयर्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता झिम्बाब्वेचा संघ सुपर-८ मध्ये कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरेल.
Comments are closed.