पाकिस्तान-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाल्यास पुन्हा होणार का? जाणून घ्या ‘रिझर्व्ह डे’चा नियम!

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सुपर-८ सामना सुरू होण्यास विलंब झाला आहे. पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोलंबोचे हवामान खेळ सुरू होऊ देईल असे वाटत नाही. हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सेमीफायनलच्या दृष्टीने सुपर-८ टप्प्यातील प्रत्येक सामना खूप मोलाचा आहे.
जर पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द घोषित करण्यात आला, तर तो पुन्हा खेळवणे शक्य आहे का? सुपर-८ सामन्यांसाठी काही ‘रिझर्व्ह डे’ (राखीव दिवस) ठेवण्यात आला आहे का, जेणेकरून सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल? याचे उत्तर आहे, नाही. टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सुपर-८ सामन्यांसाठी रिझर्व्ह डे चा कोणताही नियम नाही.
सहसा बहुराष्ट्रीय स्पर्धांच्या बाद फेरीतील (नॉकआउट) सामन्यांसाठी रिझर्व्ह डे ठेवला जातो. मात्र, सुपर-८ फेरीत प्रत्येक संघाला तीन-तीन सामने खेळायचे आहेत, त्यामुळे आजचा सामना रद्द झाला तरी पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असेल. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण मिळेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंड सुपर-८ च्या ग्रुप-२ मध्ये आहेत. याच ग्रुपमध्ये इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ देखील आहेत.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यान पाच-पाच ओव्हरचा सामना खेळवण्यासाठी रात्री १०:१६ ही ‘कट-ऑफ’ वेळ निश्चित करण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजून १० मिनिटांपासून ओव्हर्स कमी व्हायला सुरुवात झाली आहे. जर पाच-पाच ओव्हर्सचा खेळही होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना एक-एक गुण विभागून दिला जाईल.
विशेष म्हणजे, गेल्या ८ टी-२० सामन्यांमध्ये न्यूझीलंडने पाकिस्तान संघावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. उभय संघांमधील गेल्या ८ टी-२० सामन्यांत पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडला केवळ २ वेळाच हरवू शकला आहे. मात्र, टी-२० क्रिकेटमधील एकूण ‘हेड-टू-हेड’ रेकॉर्ड पाहिला तर पाकिस्तानचे पारडे जड आहे.
Comments are closed.