संगणक अपहरण वेबसाइटवर बंदी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विकीपिडियाच्या इंग्रजी आवृत्तीने ‘आर्काईव्हज.टुडे’ या वेबसाईटवर बंदी घातली आहे. ही वेबसाईट उपयोगकर्त्यांचे संगणक ‘हायजॅक’ करत असल्याचे आणि नंतर त्या संगणकांचा उपयोग हॅकिंग हल्ले करण्यासाठी करत असल्याचे निदर्शनास आल्याने ही बंदी घालण्यात आली आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या वेबसाईटसंबंधी अनेक तक्रारी होत्या. या वेबसाईटकडून इतरांच्या वेब पानांमध्ये आणि स्नॅपशॉटस्मध्ये अवैध बदल करण्यात येत होते. तसेच ‘डिनायल ऑफ सर्व्हिस’चीही तक्रार करण्यात आली होती. ही वेबसाईट विशिष्ट सॉफ्टवेअरचा उपयोग करुन हे उपद्व्याप करीत होती, असे विकीपिडियाच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर ही कठोर कारवाई या वेबसाईटच्या विरोधात करण्यात आली आहे.
ही वेबसाईट 2023 पासूनच अशा उद्योगांमध्ये गुंतलेली होती, असे विकीपिडियाने केलेल्या संशोधनात दिसून आले होते. काही विशिष्ट ब्लॉग्जना लक्ष्य करुन त्यांना हायजॅक करण्याचे प्रकार करण्यात येत होते. ज्या लोकांशी या वेबसाईटच्या व्यवस्थापकांचे मतभेद असतील किंवा भांडणे झाले असेल, असा व्यक्तींना लक्ष्य बनविण्यात येऊन त्यांना आवश्यक त्या वेब सेवा देण्याचे टाळले जात होते. त्यामुळे अनेक व्यक्तींची मोठी हानी झाल्यानंतर या वेबसाईटच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या. अखेर ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Comments are closed.