'ऑल फॉर द गुड – ऑल फॉर द हॅप्पी' यावर जागतिक एकमत

88 देश, संघटनांकडून भारताच्या दृष्टिकोनाचे समर्थन : ‘एआय समिट’च्या माध्यमातून मिळाले मोठे पाठबळ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ला मोठे राजनैतिक आणि तांत्रिक यश मिळाले आहे. 88 देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी शिखर परिषदेच्या घोषणेवर स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी यासंबंधीची माहिती देताना जगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मानव-केंद्रित एआय व्हिजन’ उघडपणे स्वीकारल्याचे स्पष्ट केले. जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सुरक्षित, न्याय्य आणि जबाबदार विकासाच्या दिशेने हे पाऊल एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. एकूण 88 स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी 86 देश आणि दोन आंतरराष्ट्रीय संस्थांनी ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ (सर्वांचे कल्याण, सर्वांचे सुख) या तत्वाचा औपचारिक स्वीकार केला असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांना सांगितले. या दृष्टिकोनाचे मुख्य उद्दिष्ट एआय संसाधनांचे लोकशाहीकरण करणे हे असून ते प्रगत तंत्रज्ञान आणि त्याचे आर्थिक फायदे जगभरातील समाजाच्या प्रत्येक वर्गाला उपलब्ध होतील, असा आशावाद व्यक्त केला.

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’मधील या ऐतिहासिक घोषणेमध्ये एआय सारख्या क्रांतिकारी तंत्रज्ञानावर आता कोणत्याही एका देशाची किंवा काही टेक कंपन्यांची मक्तेदारी राहणार नसल्याचे म्हटले आहे. 88 देश आणि संघटनांची ही एकता एआयच्या सुरक्षित विकासासाठी आणि त्याचे आर्थिक फायदे विकसनशील देशांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग मोकळा करेल. उद्योग आणि गुंतवणूकदार या सहमतींचे व्यावहारिक आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये कसे रुपांतर होते यावर बारकाईने लक्ष ठेवतील.

16 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाने अनेक प्रमुख आघाड्यांवर जागतिक धोरणे आकार देण्यासाठी एक मजबूत पाया घातला. अनेक देशांना एकत्र करत भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर भविष्यकाळ नजरेसमोर ठेवत सखोल चर्चा घडवून आणली.

कार्यक्रमादरम्यान राजकीय वाद

तंत्रज्ञान आणि धोरणनिर्मितीवरील या महत्त्वाच्या जागतिक परिषदेदरम्यान काही राजकीय वादांमुळेही गालबोट लागले. कार्यक्रमस्थळी भारतीय युवा काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या शर्टलेस/टॉपलेस निषेधावर जोरदार टीका झाली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, राज्यमंत्री जयंत चौधरी, भाजप नेते शाहजाद पूनावाला तसेच बीआरएस नेते केटीआर यांनी याला एक ‘राजकीय चाल’ म्हटले. या प्रकरणात, दिल्ली पोलिसांनी युवा काँग्रेसच्या निदर्शकांना अटक केली आहे.

भारतातील यशस्वी एआय समिट…

ग्लोबल साउथचे नेतृत्व : ग्लोबल साउथमध्ये होणारी ही जगातील पहिली जागतिक एआय शिखर परिषद खूपच प्रेरणादायी ठरली.

भागधारक मंच : या कार्यक्रमात जगभरातील सरकारी धोरणकर्ते, एआय उद्योग तज्ञ, शिक्षणतज्ञ, तंत्रज्ञान नवोन्मेषक आणि नागरी प्रतिनिधी एकत्र आले.

मानवतेसाठी एआय : शिखर परिषदेत एआयच्या परिवर्तनीय क्षमतेचा विचार करण्यावर आणि ‘एआय फॉर ह्युमॅनिटी’ या जागतिक तत्त्वावर भर देण्यात आला.

प्रशासन आणि सुरक्षितता : एआय प्रशासन, सुरक्षा मानके आणि समाजावर त्याचा प्रभाव यावर जागतिक सहकार्य मजबूत करण्यासाठी ही शिखर परिषद विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रक्रियेचा एक भाग ठरली.

 

 

Comments are closed.