भटकंती – युद्धभूमी ते पर्यटन महासत्ता
>> प्रभा कुडके, [email protected]
सलग 20 वर्षे युद्धामध्ये भरडल्या गेलेल्या व्हिएतनामचा 'युद्धभूमी ते पर्यटन महासत्ता' हा प्रवास जगातील अनेक विकसनशील देशांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे.
व्हिएतनाम… सलग 20 वर्षे युद्धामध्ये भरडला गेलेला हा देश आता आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे केंद्र बनला आहे. पर्यटनाला व्हिएतनामने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. तब्बल 20 वर्षे व्हिएतनाम हा देश युद्धाच्या छायेत होता. त्यातून नंतर तो पर्यटनाचा केंद्रबिंदू बनला. 1955 ते 1975 व्हिएतनाम आणि अमेरिका या दोन देशांमध्ये सलग 20 वर्षे युद्ध सुरू होते. युद्धानंतर देशाची झालेली गलितगात्र अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधांची कमतरता अशा विविध अडचणींवर मात करत व्हिएतनामने पर्यटन क्षेत्रात निर्णायक प्रगती केली. म्हणूनच ‘युद्धातून पर्यटनाकडे’ हा व्हिएतनामचा प्रवास सर्वच देशांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.
व्हिएतनामने गेल्या तीन-चार दशकांत पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेली क्रांती ही केवळ आर्थिक वाढीची गोष्ट नाही, तर ती धोरणात्मक नियोजन, जागतिक संपर्क, सांस्कृतिक जपणूक आणि पायाभूत सुविधांचा झपाट्याने झालेला विकास यांची गुंफण आहे. 1975मध्ये अमेरिकेसोबतचे युद्ध संपल्यानंतर व्हिएतनामसमोर पुनर्बांधणीचे मोठे आव्हान उभे राहिले होते. या काळात पर्यटन हा प्राधान्याचा विषय नव्हता, तर देशातील मूलभूत सोयीसुविधांकडे लक्ष देणे हेच प्राधान्य होते.
व्हिएतनाममधील पर्यटन क्रांतीचा खरा पाया 1986मध्ये सुरू झालेल्या डोई मोई या आर्थिक सुधारणांनी घातला. या धोरणांतर्गत परदेशी गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली, खासगी उद्योगांना प्रोत्साहन मिळाले आणि पर्यटन क्षेत्रातही आमूलाग्र सुधारणांचा श्रीगणेशा झाला. हॉटेल्स, रिसॉर्टस्, रस्ते, विमानसेवा आणि मार्गदर्शक सेवा यामध्ये गुंतवणूक वाढली.
1990च्या दशकात व्हिएतनामने जगासाठी आपले दरवाजे उघडले आणि पर्यटकांची संख्या हळूहळू वाढू लागली. या काळात युनेस्को काही ठिकाणांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. उदाहरणार्थ, ‘हा लांग बे’ हे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध ठिकाण 1994 मध्ये जागतिक वारसा स्थळ ठरले. इथल्या चुनखडीच्या बेटांनी आणि हिरव्यागार समुद्राने जगभरातील पर्यटकांना आकर्षित केले. तसेच होई एन हे प्राचीन शहर आणि माय सन सॅन्च्युरी यांनाही 1999 मध्ये मान्यता मिळाली. या युनेस्कोच्या मान्यतेमुळे व्हिएतनाम पर्यटन जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागले.
राजधानी हनोई , आर्थिक केंद्र हो चि मिन्ह शहर आणि किनारपट्टीवरील डा नांग ही शहरे पर्यटनाचा केंद्रबिंदू बनली. व्हिएतनामकडे 3 हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची समुद्र किनारपट्टी आहे. तसेच हा लांग बे चुनखडीच्या बेटांसाठी, डा नांग सुंदर समुद्रकिनारे, न्हा ट्रांग रिसॉर्ट पर्यटन, फु क्वोक लक्झरी बेट पर्यटन अशा बाबींसाठी इथले पर्यटन प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक पर्यटन, युद्ध स्मारके, भुयारी बोगदे, खाद्य संस्कृती आणि साहसी पर्यटन यामुळे सर्व प्रकारच्या वयोगटाला व्हिएतनामने आकर्षित केले. चीन, फ्रान्स आणि स्थानिक राजवटींचा प्रभाव येथे आजही पाहायला मिळतो.
व्हिएतनाम युद्ध हे रणांगणांपेक्षाही अधिक जंगलांनी, पर्वतरांगांनी, डोंगरांनी, खोऱयांनी, गुहांनी, भूगर्भीय संरचनांनी आणि नैसर्गिक मार्गांचा वापर करून लढले गेले. आजच्या घडीला पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली ठिकाणे त्या काळी युद्धामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावत होती. कू चि टनेल्स भूगर्भीय प्रणालीचा युद्धातला सर्वोत्तम उपयोग हा या युद्धात पाहायला मिळतो. कू चि जिह्यातील हे एक विशाल भूगर्भीय टनेल नेटवर्क होते. जवळपास 250 किमी लांबीचे हे भुयारी बोगदे हाताने खोदून निर्माण करण्यात आले. प्राथमिक टनेल 1940 च्या दशकात बनले, पण 1960 नंतर ते जसजसे विस्तारले हे संपूर्ण भूमिगत नेटवर्क झाले. होते. कू चि टनेल्स चा वापर सैन्य, वाहतूक तसेच हवाबंद सुरक्षित जागेसाठी का जात असे. आज हेच ठिकाण पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. तीन ते साडेतीन फूट उंची असलेल्या या भुयारी बोगद्यांमधून फक्त गुडघ्यावर सरपटत जावे लागते. यावरून त्या काळी कशा पद्धतीने या भुयारी बोगद्यांचा वापर केला असेल याची कल्पना येते.
हो चि मिन्ह ट्रेल हा उत्तर ते दक्षिण व्हिएतनामपर्यंत जाण्यासाठी जंगलातील मार्ग होता. घनदाट पर्वतरांगा आणि दाट झाडी या मार्गाचा वापर हा व्हिएतनाम युद्धात खूप केला गेला होता. हा ट्रेल पूर्णपणे लाओस आणि कंबोडियामधूनही जात असे. या मार्गामुळेच अमेरिकेने केलेले हवाई हल्ले हे व्हिएतनामला परतवून लावण्यात यश आले. यातील बेन डाक आणि बेन डिन्ह टनेल्स पर्यटकांसाठी खुली असून या भुयारी बोगद्यांचा याचि देही याचि डोळा अनुभव घ्यायलाच हवा. मेकांग डेल्टा, निन्ह बिन्ह परिसरातील नद्यांच्या वापर युद्धामध्ये लपण्यासाठी, दळणवळणासाठी केला गेला होता. सध्याच्या घडीला याच युद्धाच्या खाणाखुणा जपलेल्या जागा पर्यटकांच्या प्रथम पसंतीची ठिकाणे आहेत.
आजच्या घडीला व्हिएतनाम हा केवळ युद्धाच्या आठवणींसाठी नव्हे, तर नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा, स्वादिष्ट खाद्य संस्कृती आणि आदरातिथ्य यासाठी जगभर ओळखला जातो. ‘युद्धभूमी ते पर्यटन स्वर्ग’ हा व्हिएतनामचा प्रवास अनेक विकसनशील देशांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.
Comments are closed.