पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर ‘एअर स्ट्राईक’, एकाच कुटुंबातील 17 सदस्यांसह 19 जणांचा मृत्यू

पाकिस्तान हवाई दलाने अफगाणिस्तानच्या सीमेजवळील नंगरहार आणि पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केले आहेत. निवासी भागांना लक्ष्य करून केलेल्या या हल्ल्यात महिला आणि मुलांसह 19 जण ठार झाले आहेत. गनी खेलो आणि बेहसूद (गर्दा सामिया) जिल्ह्यांत हे हल्ले करण्यात आल्याची माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली. या भीषण हवाई हल्ल्यामध्ये एकाच कुटुंबातील 17 सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी रमजानच्या पवित्र महिन्यात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. शनिवारी रात्री पाकिस्तानने नंगरहार आणि पक्तिका प्रांतात आमच्या निष्पाप नागरिकांवर हवाई हल्ला केला. यात महिला, मुलांसह एक डझनहून अधिक लोक मारले गेले आणि अनेक जखमी झाले. पाकिस्तानी जनरल त्यांच्या देशातील सुरक्षा यंत्रणेचे अपयश लपवण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत, असा संताप झबिहुल्ला मुजाहिद यांनी व्यक्त केला.

अफगाण वृत्तवाहिनी ‘टोलो न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यात बेहसूद जिल्ह्यात एका घराला लक्ष्य करण्यात आले. स्फोटामुळे या भागातील घरं भुईसपाट झाले असून एकाच कुटुंबातील 23 सदस्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यापैकी आतापर्यंत केवळ चौघांना बाहेर काढण्यात यश आले असून बचावकार्य अद्याप सुरू आहे. या हल्ल्यात एका कुटुंबातील 19 पैकी केवळ 2 सदस्य जिवंत वाचले आहेत, असा दावा सोशल मीडियावरील ‘अफगाणिस्तान डिफेन्स’ या हँडलने केला आहे. यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, पाकिस्तानने या हवाई हल्ल्यांची पुष्टी केली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, फितना अल ख्वारीज, त्यांचे संबंधित गट आणि दहशतवादी संघटना इसिस-के यांच्याशी संबंधित सात छावण्यांवर अचूकपणे हल्ले करण्यात आले. तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आणि इतर गट अफगाणिस्तानच्या भूमीवरून कारवाया करत आहेत असा आरोप पाकिस्तानने केला. तसेच इस्लामाबाद, बाजोर आणि बन्नू येथे रमजान दरम्यान झालेले आत्मघाती हल्ले झाले होते. तसेच नुकत्याच एका हल्ल्यात 11 सैनिक आणि एका मुलाचा झालेला मृत्यू. या हल्ल्यास टीटीपी जबाबदार असल्याचा दावा पाकिस्तानने केला.

तणाव वाढणार

सीमेवर झालेल्या या हल्ल्यामुळे दोन्ही शेजारील देशांमधील संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने केली आहे.

पाकिस्तानात आत्मघाती हल्ला, पाच सुरक्षा कर्मचारी ठार

Comments are closed.