दक्षिण आफ्रिकेला बुमराहची नाहीतर ‘या’ भारतीय गोलंदाजाची भीती, डि कॉक म्हणाला, “त्याचा सामना करणे…”

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा सुपर-८ मधील भारताचा पहिला सामना आज (२२ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता खेळला जाणार आहे. या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर-विकेटकीपर क्विंटन डि कॉकने त्यांना कोणता भारतीय गोलंदाज त्रास देऊ शकतो, याबाबत सांगितले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या अप्रतिम यॉर्करने फलंदाजांना चकित केले आहे, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना त्याचे नाहीतर एका फिरकीपटूचे आव्हान आहे. वरुण चक्रवर्तीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलाच त्रास दिला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८ टी२० सामने खेळले असून त्यात २२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील एका संघांविरुद्ध एवढ्या विकेट्स घेण्याची ही अप्रतिम कामगिरी आहे. त्यामध्ये डिसेंबरमध्ये झालेल्या मालिकेतील १० विकेट्सचाही समावेश आहे. “त्याचा सामना करण्यासाठी संघातील सर्व खेळाडूंनी नीट अभ्यास केला आहे”, असे डिकॉकने म्हटले आहे.
सुपर-८च्या सामन्याआधी डिकॉक म्हणाला, “त्याचा सामना कऱण्यासाठी आमच्या सर्वांकडे वेगवेगळे नियोजन आहे. आमच्या खेळाडूंना त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे आणि वेळ आली तर आम्ही आमचा उत्तम खेळ दाखवू.”
“तो एक चांगला गोलंदाज आहे आणि आमच्या विरुद्ध त्याचे प्रदर्शनही उत्तम राहिले. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचा अभ्यास करून आमच्या खेळाडूंना त्याचा कसा सामना करायचा हे ठरवले असेल. त्याच्याविरुद्धची आमच्या खेळाडूंची रणनीती योग्य सिद्ध झाली पाहिजे,” असेही डिकॉकने पुढे म्हटले आहे.
अभिषेक शर्माबद्दलही डिकॉकने त्याचे मत व्यक्त केले आहे. तो म्हणाला, “तो टी२० जागतिक क्रमवारीत क्रमांक एकचा खेळाडू आहे. तो एक युवा खेळाडू असून कधी ना कधी अपयश हे येतेच, मात्र अव्वल क्रमांकाचा काही दर्जा असतो आणि मला विश्वास आहे तो या स्पर्धेत एक उल्लेखनीय खेळी खेळणार.”
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेही अभिषेकवर विश्वास दाखवला आहे आणि तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार हे पण निश्चित केले आहे. अभिषेक खेळलेल्या तिन्ही साखळी सामन्यात शून्यावर बाद झाला होता.
Comments are closed.