तंजावरचे स्थलमहात्म्य – मराठी रंगभूमीचे जनक शहाजीराजे भोसले

>> प्रा. समीर जाधव ([email protected])

मराठी रंगभूमीचा उदय हा महाराष्ट्राबाहेर तंजावरमध्ये शहाजीराजे भोसले (दुसरे) यांनी लिहिलेल्या व प्रयोगरूपाने सादर केलेल्या नाटकांमुळे झाला असून त्यांनी लिहिलेली अकरा मराठी नाटकं आजही सरस्वती महाल ग्रंथालयात उपलब्ध आहेत.

सांगली संस्थानाच्या दरबार हॉलमध्ये 5 नोव्हेंबर 1843 रोजी विष्णुदास भावे यांच्या ‘सीतास्वयंवर’ ह्या नाटकाचा प्रयोग म्हणजे महाराष्ट्रातील मराठी नाटकाचा पहिला प्रयोग होय. असे असले तरी मराठी रंगभूमीचा उदय हा महाराष्ट्राबाहेर तंजावरमध्ये शहाजीराजे भोसले (दुसरे) यांनी लिहिलेल्या आणि प्रयोगरूपाने सादर केलेल्या नाटकांमुळे झाला असून ते मराठीतील आद्य नाटककार होत.

शहाजीराजे भोसले (दुसरे) यांच्या नावावर 19 नाटके असून त्यापैकी लक्ष्मीनारायण कल्याण, गोवर्धनउद्धरण, सुभद्रापरिणय, गंगा-कावेरीसंवाद, लक्ष्मी-भूदेवीसंवाद, हरिहरविलास, मृत्युंजय चिरंजीव, कुश-लव कथा, पंचभाषाविलास, त्यागराजविलास, विटाधिपशुविलास (प्रहसन) ही अकरा मराठी नाटके आज सरस्वती महाल ग्रंथालयात उपलब्ध आहेत. मराठीसोबत तेलगू, तामीळ, संस्कृत, हिंदी या भाषांमध्येही शहाजींनी नाटय़निर्मिती केलेली आहे. केवळ नाटकच नव्हे तर संगीतमय पद, काव्य, भाष्यात्मक ग्रंथांची रचना शहाजींनी केलेली आहे. शहाजीराजे भोसले (दुसरे) यांचे मराठीतील पहिला नाटककार या अर्थाने- ‘श्री विटाधिपसुविलास’ हे नाटक म्हणजे त्या काळात गद्य-नाटय़लेखनाचा केलेला पहिला प्रयत्न आहे. त्यांचा हा प्रयत्न आधुनिक गद्य-नाटकाची पूर्वपीठिका म्हणून पाहायला हवा. त्याचबरोबर शहाजीराजेंना पहिल्या एकांकिकाकाराचे आणि पहिल्या प्रहसनकाराचे श्रेय द्यावे लागेल.

व्यंकोजींच्या मृत्यूनंतर शहाजीराजे भोसले (दुसरे) यांनी इ.स. 1684-1712 पर्यंत तंजावरवर राज्य केले. शहाजी यांचा जन्म बेंगलोर येथे 1670 मध्ये झाला. शहाजीराजे (दुसरे) जेव्हा गादीवर आले तेव्हा जेमतेम तेरा-चौदा वर्षांचे होते. सुरुवातीच्या कालखंडात आई दीपाबाई व त्यांचे कुशल मंत्री हे त्यांचे मार्गदर्शक होते. दुसऱया शहाजीराजेंनी व्यंकोजींच्या वेळची राज्य कारभाराची व्यवस्था पुढे चालू ठेवली. इ.स. 1699 मध्ये 40 हजार घोडदळ व पायदळ सैनिकांच्या फौजेसह ट्रांक्वेबार हे ठिकाण काबीज केले. इ.स. 1702 मध्ये त्यांनी त्रिचनापल्लीच्या मंगम्माला रामनाडच्या सेतूपतींविरुद्ध मदत केली. 1682 ते 1686 दरम्यान मदुराईचा बहुतेक प्रदेश तंजावर व म्हैसूर राज्यकर्त्यांच्या ताब्यात होता. शहाजीराजे(दुसरे) यांनी 1686 मध्ये एका निर्णायक लढाईत मादुरल सैन्याचा पराभव केला आणि दक्षिणेकडे पसरलेला सर्व पट्टुकोट्टई प्रदेश काबीज केला. सेतुपती आणि मदुराई राज्यकर्त्यांमधील युद्धात शहाजींनी मदुराई सैन्याचा पराभव करण्यासाठी सेतूपतींना मदत केली आणि म्हणूनच त्यांनी संपूर्ण पट्टुकोट्टई आणि लगतचा कल्लार प्रदेश ताब्यात घेतला जो पांबर नदीपर्यंत पसरला होता. शहाजीराजेंच्या (दुसरे) नंतरच्या काळात राज्यविस्तार व युद्धसामग्रीच्या दृष्टीने फारसे प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही.

शहाजीराजे (दुसरे) हे संस्कृत, तेलुगू, मराठी आणि तामीळ या भाषांत पारंगत होते. अनेक भाषांमधील त्यांचे वाङ्मयीन कार्य संख्यात्मकदृष्टय़ा लक्षणीय आहे. त्यांच्या दरबारात त्यांचा मंत्री कवी रघुनाथ पंडित, त्र्यंबकराय मखी, आनंदराया मखी, वेंकटकृष्ण दीक्षित, रामभद्रमखी, कोकनाथामाखी, भूमिनाथ कवी, श्रीनिवास दीक्षित असे प्रतिभावंत कवी आश्रयाला होते. इ.स. 1693 साली शहाजीराजेंनी प्रतिभावंत, पंडित, कलावंत यांच्यासाठी कावेरी नदीवरील तिरुवसनलुर हे गाव देणगी म्हणून दिले. या गावाला ‘शाहजीपुरम’ असे नाव देण्यात आले. सर्जकनिर्मिती करणाऱया प्रतिभावंतांसाठी याप्रकारे गाव वसविणारा हा पहिला मराठी राजा होय. असा राजा पुढील काळात झालेला आढळत नाही.

(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)

Comments are closed.