Sharad Pawar Health Update – शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, पुण्यातील रुबी रुग्णालयात केलं दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फोटो – चंद्रकांत पालकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. रविवारी सकाळी त्यांना पुन्हा पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवून सलाईन देण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना अशक्तपणा जाणवत आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पवारांना अशक्तपणा जाणवत असल्याचे कळते. यामुळे त्यांना तात्काळ रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांना सलाईन लावण्यात आले असून डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी या वृत्ताची पुष्टी केली असून याबाबत त्यांनी एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे. आम्ही बाबांना पुन्हा एकदा रुबी क्लिनिकमध्ये दाखल करत आहोत. त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहे. त्यांना थोडा अशक्तपणा जाणवत असून शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करत असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.

दरम्यान, छातीत कफ साचल्याने आणि श्वास घेण्यास अडचण होत असल्याने 9 फेब्रुवारी रोजी शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 5 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्यांना तीन-चार दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र आता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments are closed.