INDvsSA: नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालायं धावांचा पाऊस, जाणून घ्या पिच आणि हवामान रिपोर्ट

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (२२ फेब्रुवारी) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर-८चा सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार असून सामन्याला सुरूवात संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. दोन्ही संघांनी त्यांच्या साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत. यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार हे नक्की. त्यासाठी खेळपट्टीचा रिपोर्ट जाणून घेऊ.

या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळपट्टीपैकी एक अशी ही नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी आहे. काळ्या मातीची ही खेळपट्टी असल्याने फलंदाजांसाठी स्वर्ग असल्याचे म्हटले जाते. गोलंदाजीसाठीही अनुकूल आहे. येथे टी२० विश्वचषकाचे ४ सामने खेळले गेले असून त्यामध्ये दोन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या डबल सुपर ओव्हरचा सामना येथेच खेळला गेला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली होती.

येथे खेळण्यात आलेल्या या स्पर्धेच्या सामन्यांमधील ८ पैकी ७ डावांमध्ये १७५ पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत. येथे प्रथम फलंदाजी करणे योग्य असून सरासरी धावसंख्या १७५ एवढी बनते. दुसऱ्या फलंदाजीवेळी सरासरी १५१ धावा झाल्या आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ३५ टी२० सामने खेळले गेले. ज्यामध्ये भारताने २१ सामने जिंकत मोठी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने १३ सामने जिंकले असून एका सामन्याचा निकाल लागला नाही. तसेच या स्टेडियमवर हे भारताने ९ सामने खेळले आहेत. त्यातील ७ सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत.

अहमदाबादचे हवामानही उत्तम असल्याने सामन्याला पावसाचा काही धोका नाही. दोन्ही संघांनी या स्पर्धेत त्यांचे चारही साखळी सामने जिंकले आहेत. यामुळे कोण कोणाचा विजयीरथ रोकणार याकडे लक्ष असणार आहे.

त्याचबरोबर टी२० विश्वचषकात दोन्ही संघांचे समीकरण भारत ५- २ दक्षिण आफ्रिका असे आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय टी२० विक्रम
समोर – 12
प्रथम फलंदाजी करत जिंकलेले सामने – ८
दुसऱ्या वेळेस फलंदाजी करताना जिंकलेले सामने – ४
नाणेफेक जिंकत जिंकलेले सामने – ६
नाणेफेक गमावत जिंकलेले सामने – ६

Comments are closed.