ब्लड टेस्ट अन् सिटीस्कॅन केला, शरद पवारांचा रिपोर्ट नॉर्मल; डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
शरद पवार आरोग्य अपडेट: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची प्रकृती रविवारी काहीशी बिघडली. त्यांना अशक्तपणा जाणवत असल्यामुळे पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात (Ruby Hospital) दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे शरद पवार यांना थकवा जाणवत असल्याचे सांगण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच शरद पवार (Sharad Pawar) यांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने बारामतीवरुन पुण्याला आणण्यात आले होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर शरद पवार यांना 15 फेब्रुवारीला घरी सोडण्यात आले होते. मात्र, आज त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Pune News)
रुबी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. परवेझ ग्रँट यांनी प्रसारमाध्यमांना पवारांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, शरद पवार यांना दोन दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना काही त्रास झाल्यामुळे उपचार सुरू करण्यात आले आहेत. पुढील दोन दिवस शरद पवार रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेतील, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. शरद पवारांची रक्ताची चाचणी करण्यात आली आहेत. तसेच त्यांचा सिटीस्कॅन देखील करण्यात आलेला आहे. या दोन्ही चाचण्यांचे अहवाल साधारण आल्याचेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असणारे विठ्ठल मणियार यांनी रुबी रुग्णालयात जाऊन आज शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, शरद पवार यांची प्रकृती सध्या चांगली आहे. त्यांना रुटीन चेकअपसाठी रुबी रुग्णालयात आणण्यात आले आहे. गेल्या आठवडाभर ते थोडे अस्वस्थ होते. त्यानंतर नियमित तपासणी व विविध वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संध्याकाळनंतर डॉक्टर त्यांच्या अहवालांच्या आधारे पुढील निर्णय घेतील—त्यांना किती दिवस अॅडमिट ठेवायचे किंवा नाही, हे तेव्हा ठरवले जाईल. डॉक्टरांनीच त्यांना तपासणीसाठी बोलावले होते, त्यामुळे ते येथे आले आहेत. शरद पवार पूर्णपणे फिट आहेत आणि त्यांना कोणतीही गंभीर समस्या नाही, असे डॉक्टर विठ्ठल मणियार यांनी सांगितले.
आणखी वाचा
मोठी बातमी: शरद पवारांची प्रकृती बिघडली, सलाईन लावण्यासाठी पुन्हा रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल
आणखी वाचा
Comments are closed.