ग्रामदेवता आली मिरवत रे होलिओ’, ‘हुरा रे हुरा आमच्या देवाला मानाचा तुरा रे होलिओ……! आजपासून कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह
कोकणवासियांचा सर्वात लोकप्रिय आणि जिव्हाळ्याचा सण असलेल्या शिमगोत्सवाला (२२) तारखेपासून फाकपंचमीच्या मुहूर्तावर सुरुवात होणार आहे. रविवारी दुपारनंतर गावोगावी ढोल-ताशांचा गजर सुरू होईल आणि शेवरीची होळी आणण्यासाठी वाडी-वठारांतील ग्रामस्थ निघतील. दरम्यान, काही ठिकाणी आधीच शेवरीच्या होळ्या आणून ठेवल्याचे चित्र आहे.
कोकणात गणेशोत्सवाप्रमाणेच शिमगोत्सवही भक्तीभावाने आणि उत्साहात जल्लोषात साजरा केला जातो. कोकणातून मुंबईसह अन्य शहरांत स्थायिक झालेले चाकरमानीही खास सुट्टी काढून या उत्सवासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आवर्जून दाखल होतात. यंदा २ मार्च रोजी होळी पौर्णिमा, ३ मार्चला धूळवड तर ८ मार्च रोजी रंगपंचमी साजरी होणार आहे.
आयनाच्या बायना.. घेतल्याशिवाय जायना..’ असे म्हणत संकासूर, विविध मुखवटे परिधान करून बालदोस्त व गवळणी फिरण्यास सुरुवात झाली आहे. लहान मुले व तरुण रात्रीच्या वेळी नमन, मुखवटे घालून घरोघरी फिरत आपली कला सादर करतात.
शिमगोत्सवाच्या निमित्ताने गावोगावी विविध पारंपरिक प्रथा जपल्या जाणार आहेत. ग्रामदेवतेच्या मंदिरात रूपं लावून ग्रामदैवत भक्तांच्या भेटीला निघते. पालख्यांमधून या देवतांना नेण्यात येते. वर्षातून एकदाच देव घरोघरी फिरून भक्तांना दर्शन देतो.त्यामुळे गावकरीच नव्हे तर नोकरी-धंद्यानिमित्त बाहेरगावी असलेले ग्रामस्थही मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात.होळी तोडण्यापासून होम करण्यापर्यंत तसेच रूपं लावून घरोघरी फिरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी मानपान, परंपरा आणि संकेत पाळले जातात. मानकरी, पंचमंडळी आणि गावकऱ्यांच्या सूचनांनुसारच उत्सव साजरा करण्यावर भर दिला जातो.
अमंगलाची होळी व फाकांचा गजर
समाजातील वाईट रूढी, परंपरा आणि अमंगल गोष्टी नष्ट करण्याचे प्रतीक म्हणून होळी साजरी केली जाते. मनातील किल्मिषांची होळी करून पुढील वर्षभर प्रसन्न आणि ताजेतवाने राहण्याचा संदेश या सणातून दिला जातो.यासाठी फाका घालण्याची परंपरा आहे. ‘हाय रे हाय आणि अमक्याच्या जीवात काय नाय रे होलिओ’, ‘करवत रे करवत आणि आमची ग्रामदेवता आली मिरवत रे होलिओ’, ‘हुरा रे हुरा आणि आमच्या वाघजाई नवलाईला सोन्याचा तुरा रे होलिओ’ अशा फाक्यांचा गजर लवकरच कोकणभर ऐकू येणार आहे.
Comments are closed.