Latur News – जमिनीच्या वादातून धाकट्या भावाकडून मोठ्याची निर्घृण हत्या; 72 तासात पोलिसांनी लावला छडा
वडिलोपार्जित शेतीच्या वादाने एका सुखी कुटुंबाचा अंत केला असून, जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या धाकट्या भावानेच मोठ्या भावाचा काळजाचा थरकाप उडवणारा खून केल्याची धक्कादायक घटना निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे घडली आहे. पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब विलास खरोशे आणि त्यांचा धाकटा भाऊ उल्हास विलास खरोशे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वडिलोपार्जित शेतीच्या वाटणीवरून तीव्र वाद सुरू होता. हा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस विकोपाला गेला होता. वादाच्या भरात संतापाने आंधळ्या झालेल्या उल्हासने आपला मोठा भाऊ गुलाब यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. सुरुवातीला दोरीने गळा आवळून आणि त्यानंतर काठी व कातीने बेदम मारहाण करून गुलाब यांची निर्घृण हत्या केली.
पोलिसांची ७२ तासांत धडाकेबाज कामगिरी
घटनेची माहिती मिळताच निलंगा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खूनाचा कोणताही ठोस पुरावा समोर नसताना, पोलीस निरीक्षक बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सखोल चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयाची सुई उल्हासकडे वळवली. पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. अवघ्या ७२ तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आरोपी उल्हास खरोशे याला जेरबंद केले. या कामगिरीत पोलीस निरीक्षक बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गर्जे, पोलीस हवालदार सुनील पाटील, आबा इंगळे, डावरगावे व इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
च्या
सख्ख्या भावाच्या हातून भावाचाच खून झाल्याने रामलिंग मुदगड गावावर शोककळा पसरली आहे. “जमिनीसाठी माणूस इतका निर्दयी कसा होऊ शकतो?” असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात जमिनीच्या वादातून होणाऱ्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Comments are closed.