बुमराहचा धमाका! 3 विकेट्स घेत रचला इतिहास; अश्विनचा मोठा विक्रम मोडला

जेव्हा जेव्हा टीम इंडियाच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांचा विषय निघतो, तेव्हा त्यात जसप्रीत बुमराहचे नाव नक्कीच येते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात बुमराहने यामागचे कारण स्पष्ट केले आहे. टॉस हरल्यानंतर प्रथम गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियासाठी बुमराहने अप्रतिम कामगिरी केली. यासोबतच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला असून, टीम इंडियाचा सुपरस्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा विक्रम मोडला आहे.

​टीम इंडियाचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ४ षटके टाकली. यात केवळ १५ धावा देऊन त्याने ३ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये धाडले. बुमराहने पॉवरप्लेमध्येच क्विंटन डी कॉक आणि रयान रिकेल्टनला बाद केले. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये येऊन त्याने कॉर्बिन बॉशला बाद केले. याच कारणामुळे आफ्रिकेचा संघ २०० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही.

​३ विकेट्स घेताच जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात बुमराह सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. बुमराहने २२ सामन्यांत ३३ विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम रविचंद्रन अश्विनच्या नावावर होता. अश्विनने २४ सामन्यांत ३२ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहने बॉशची विकेट घेताच अश्विनला मागे टाकले आहे.

​सुपरस्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त अर्शदीप सिंगनेही रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अर्शदीप सिंगने आफ्रिकेविरुद्ध ४ षटकांत २८ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. यासह अर्शदीप सिंगच्या नावावरही आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये ३२ विकेट्स झाल्या आहेत. बुमराह आणि अर्शदीप सिंग या शर्यतीत एकमेकांना मागे टाकत आहेत. सध्या बुमराह पुढे गेला आहे. पुढच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध आता अर्शदीप बुमराहला मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.

Comments are closed.