किश्तवाडमध्ये जैशचे दोन दहशतवादी ठार

सुरक्षा दलांकडून तळ उद्ध्वस्त

► न्यूज एजन्सी/ श्रीनगर

जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधील चतरू भागात रविवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ‘जैश’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारल्याची पुष्टी केली आहे. सुरक्षा दलांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत दहशतवादी लपलेला तळ उद्ध्वस्त केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या भागात शोधमोहीम सुरू होती.

पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनंतर सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्यानंतर चकमक होऊन दोन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात सुरक्षा दलाला यश प्राप्त झाले. यापूर्वी, 4 फेब्रुवारी रोजी सुरक्षा दलांनी चतरूमध्ये जैशच्या एका दहशतवाद्याला ठार मारले होते. त्याचप्रमाणे, उधमपूर जिह्यात दोन जैश दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

10 लाखांचे बक्षीस असलेला कमांडर सैफुल्लाहचा खात्मा?

सूत्रांच्या माहितीनुसार, चकमकीत मारला गेलेला दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात कमांडर सैफुल्लाह असू शकतो. सैफुल्लाह याच्यावर प्रशासनाने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तथापि, लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी अद्याप अधिकृतपणे मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख उघड केलेली नाही. सैफुल्लाह आणि त्याचे दोन साथीदार या भागातील जंगलात लपल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. गेल्या 36 दिवसांपासून किश्तवाडच्या या दुर्गम आणि घनदाट जंगलात सतत दहशतवादविरोधी मोहीम सुरू आहे. या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांनी यापूर्वी आदिल या जैशच्या आणखी एका कुख्यात दहशतवाद्याला ठार मारले होते.

Comments are closed.