देशवासियांना पंतप्रधान मोदींचा 'त्रय' मंत्र

मन की बात’द्वारे मार्गदर्शन : नवतंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करण्याचा तरुणाईला सल्ला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या 131 व्या भागात देशाला तीन मंत्र दिले. त्यांनी तंत्रज्ञान, अवयवदान आणि सायबर गुह्यांवर भाष्य करतानाच होळी आणि रमजानच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच दिल्लीतील ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान अनेक देशांचे नेते, उद्योजक, नवोन्मेषक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज एकत्र आल्याने जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उजळल्याचा दावाही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’द्वारे देशाला संबोधित केले. या भागात पंतप्रधान मोदींनी संवाद साधताना भविष्याबद्दल संदेशही दिला. एआयचे बदलते जग, अवयवदानाशी संबंधित मानवी संवेदनशीलता आणि डिजिटल फसवणूक टाळण्याचा इशारा या तीन विषयांद्वारे, पंतप्रधान मोदींनी देशाला नवीन युगासाठी तीन प्रमुख मंत्र दिले. या कार्यक्रमात तंत्रज्ञान, समाज आणि नागरी जबाबदारीचा एक अनोखा संगम दिसून आला. नवीन भारत केवळ डिजिटल होत नाही तर संवेदनशील आणि जागरूक देखील होत असल्याचे त्यांनी छोट्या उदाहरणांद्वारे दाखवून दिले.

मन की बातमध्ये सामान्य लोकांच्या प्रेरणादायी कथा दाखवण्यात आल्या. एआय समिटमध्ये भारताच्या वाढत्या ताकदीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जग आता भारताच्या तांत्रिक क्षमतांचा गांभीर्याने विचार करत आहे. अवयवदान करणाऱ्यांच्या कथांनी कार्यक्रमाला भावनिक आयाम दिला. डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांबद्दल त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

क्रिकेटविश्वात ‘भारतीयां’चा दबदबा

पंतप्रधान म्हणाले, ‘टी-20 विश्वचषकात अनेक देशांमध्ये भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. ते इतर देशांमधून खेळत आहेत कारण त्यांचे कुटुंब तिथे स्थायिक झाले आहे. मोदींनी कॅनेडियन संघाच्या कर्णधाराचा जन्म गुरुदासपूरमध्ये झाला होता याकडे लक्ष वेधले. कॅनडा तसेच भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. अमेरिका संघाचा कर्णधार मोनांक पटेल गुजरात अंडर 16-18 संघाकडूनही खेळला होता. ओमान, इटली आणि युएईच्या संघातही भारतीय वंशाचे खेळाडू आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

देशात अवयवदानाची गरज

पंतप्रधानांनी आपल्या कार्यक्रमात अवयवदानावरही प्रामुख्याने भर दिला. देशाला अवयवदानाची मोठी गरज असल्याचे सांगताना त्यांनी विविध उदाहरणे दिली. केरळमध्ये 10 महिन्यांची मुलगी अलिनचे निधन झाले. तिच्या पालकांना ज्या वेदना सहन कराव्या लागत असतील त्या शब्दात वर्णन करता येणार नाहीत. तिच्या पालकांनी अलिनचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. अलिनचे नाव सर्वात तरुण अवयवदान करणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. दिल्लीच्या लक्ष्मीदेवीने हृदय प्रत्यारोपणानंतर केदारनाथला प्रवास केला. तिला दात्याचे हृदय मिळाल्यामुळे लक्ष्मीचे आयुष्य बदलले. त्याचप्रमाणे, राजस्थानच्या सिकर येथील रामदेव यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले आणि ते आता खेळात सहभागी आहेत, अशी उदाहरणे त्यांनी दिली.

डिजिटल अटक जागरूकता

पंतप्रधान म्हणाले की, समाजात डिजिटल अरेस्टबद्दल जागरुकता वाढली असली तरी, अजूनही खूप सतर्कता आवश्यक आहे. लोकांची अनेकदा फसवणूक होते. कोणीतरी फोन करून म्हणतो, ‘मी एक वरिष्ठ अधिकारी आहे, कृपया तुमची माहिती शेअर करा.’ लोक याला बळी पडतात. तुम्हाला सर्वांना बँकांकडून केवायसी आणि री-केवायसी मागणारे संदेश येतात. आजकाल पेन्शन, सबसिडी, विमा आणि यूपीआय हे सर्व बँक खात्यांशी जोडलेले आहेत. म्हणून बँका वारंवार केवायसी आणि री-केवायसी तपासणी करतात. परंतु आपण फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

 

Comments are closed.