आठ संशयित दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांची तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये कारवाई : 12 मोबाईल, 16 सिमकार्ड जप्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, चेन्नई

दिल्ली पोलिसांनी रविवारी आठ संशयित दहशतवाद्यांना अटक केली. तामिळनाडूमधून सहा आणि पश्चिम बंगालमधून दोघांना गजाआड करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. हे संशयित दहशतवादी  पाकिस्तानची गुप्तचर संस्था, इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) आणि बांगलादेशी दहशतवादी संघटनांच्या आदेशानुसार दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होते, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या कारवाईच्या माध्यमातून स्पेशल सेलच्या पथकाने बांगलादेशमधील लष्कर-ए-तोयबाच्या हँडलरने चालवलेल्या मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याचा दावा स्पेशल सेलचे अतिरिक्त प्रमोदकुमार कुशवाह यांनी केला आहे.

दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडूतून अटक केलेल्या सहा संशयितांवर दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी शहरांची रेकी केल्याचा आरोप आहे. दिल्लीत ‘फ्री काश्मीर’ पोस्टर्स लावण्यात त्यांचा सहभाग असल्याचाही संशय आहे. सर्वांना रेल्वेमार्गाने दिल्लीला आणले जात असून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचा समावेश आहे. त्यांच्याकडून 12 हून अधिक मोबाईल फोन आणि 16 सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. या संशयितांकडून काही गुन्हेगारी साहित्य देखील जप्त करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.

तामिळनाडूतील तिरुप्पूर येथून अटक केलेल्या सहा जणांमध्ये मिजानूर रहमान, मोहम्मद शबत, उमर, मोहम्मद लिटन, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल यांचा समावेश आहे. त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट केल्या होत्या. आरोपींपैकी तीन जणांना उथुकुली, तीन जणांना पल्लादम आणि एकाला तिरुमुरुगनपुंडी येथून अटक करण्यात आली. हे सर्व जण बनावट आधार कार्डद्वारे त्यांची ओळख लपवून तिरुप्पुरमधील गारमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करत होते.

पोस्टर्सच्या माध्यमातून सापडले धागेदोरे

आठ संशयितांच्या अटकेमुळे दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे अतिरिक्त आयुक्त प्रमोदकुमार कुशवाह यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.  7 फेब्रुवारी रोजी काश्मिरी गेट मेट्रो स्टेशन आणि दिल्लीतील जवळच्या अनेक मेट्रो स्टेशनवरील खांबांवर देशविरोधी पोस्टर्स चिकटवण्यात आले होते. सीआयएसएफने याची गंभीर दखल घेत दिल्ली पोलीस मेट्रो युनिटला माहिती दिली. दिल्ली पोलीस मेट्रो युनिटने पोस्टर्स ओळखून त्यांचा मूळ स्त्रोत शोधून काढला. यात सदर व्यक्ती पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील लिंक सापडली. त्यानंतर स्पेशल सेलचे पथक कोलकाता येथे गेले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांना अटक करण्यात आली. यामध्ये उमर फारूख हा मालदा येथील रहिवासी आणि दुसरा रोबिल उल इस्लाम हा बांगलादेशचा रहिवासी जाळ्यात सापडला होता. अटक केलेल्या आरोपींनी दिल्लीतील अनेक ठिकाणी भारतविरोधी पोस्टर्स चिकटवल्याची कबुली दिली आहे.

बांगलादेशस्थित शब्बीरचे पडद्याआडून कारनामे

पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या उमर फारूख आणि रोबिल उल इस्लाम यांच्या चौकशीतून शब्बीर अहमद लोन हा त्यांना बांगलादेशातून निर्देश देत असल्याचे आढळून आले होते. शब्बीर अहमद लोन हा 2007 च्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या प्रकरणात दोषी ठरलेला दहशतवादी आहे. तो एका प्रमुख राजकीय नेत्याला मारण्यासाठी आल्यानंतर त्याला पकडण्यात आले. त्याने अनेक वर्षे तुरुंगात घालवली आणि शिक्षा पूर्ण केल्यानंतर तो 2018-19 मध्ये बांगलादेशला पळून गेला. आता त्याने पुन्हा त्याचे मॉड्यूल सुरू केले. तो मूळचा काश्मीरमधील गंदरबलचा रहिवासी आहे. मात्र, बांगलादेशला गेल्यानंतर त्याने लष्कर-ए-तोयबा नेतृत्वाशी पुन्हा संपर्क साधत दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्याची संघटना पुन्हा स्थापन केली. त्याने आपल्या माणसांना पुन्हा संघटित करत सुरुवातीला उमर फारूखशी संपर्क साधला. उमर त्याला भेटण्यासाठी बांगलादेशला गेला होता आणि त्याला हे पोस्टर्स चिकटवण्याचे आणि भारतातील काही संवेदनशील ठिकाणी हेरगिरी करण्याचे काम सोपवण्यासोबतच त्यांना वास्तव्यासाठी एक अपार्टमेंट भाड्याने देण्याचे काम देखील देण्यात आले होते, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

Comments are closed.