अहिल्यानगर तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; चिचोंडी पाटील, नारायण डोह येथे रविवारी पहाटे सशस्त्र दरोडे, लाखोंचा ऐवज लंपास
अहिल्यानगर तालुक्यात रविवारी पहाटे दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. चिचोंडी पाटील आणि नारायणडोह या गावांमध्ये दीड ते दोन तासांच्या अंतराने दरोडेखोरांनी कोयते, चाकू, लोखंडी कटावणीच्या साहाय्याने दोन घरांवर दरोडा टाकत घरातील व्यक्तींना बेदम मारहाण करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एकाच रात्रीत पडलेल्या या दोन दरोड्यांमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरोड्याची पहिली घटना अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या शिवारात अहिल्यानगर-जामखेड रोडवर सालेवडगाव फाटा येथील पवारवस्तीवर घडली. येथील सुदाम पवार (वय ७०) आणि त्यांची पत्नी पदम पवार (वय ६०) हे वृद्ध दाम्पत्य रात्री घरात झोपलेले असताना साधारण साडेबाराच्या सुमारास दरोडेखोर तेथे आले. त्यांनी कटावणीच्या साहाय्याने दरवाजा उघडला. घरात उचकापाचक करत असताना सुदाम पवार यांना जाग आली. तेव्हा त्यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण करत घरातील ५ तोळे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
दुसरी घटना तालुक्यातील नारायणडोह गावच्या शिवारात पहाटे दोनच्या सुमारास घडली. येथील पंढरीनाथ मारुती साठे (वय ४५) हे घराबाहेर पडवीत झोपलेले होते, तर कुटुंबीय घरात झोपलेले होते. पहाटे दोन वाजता त्यांच्या पत्नी प्रतिभा यांना बाहेर आरडाओरडा ऐकू आला. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता, ५ दरोडेखोर आणि पंढरीनाथ साठे यांच्यात झटापट सुरू होती. या दरोडेखोरांच्या हातात कोयते, चाकू व लोखंडी कटावणी असे साहित्य होते. त्यातील एकाने पंढरीनाथ यांच्यावर चाकूने वार केले. त्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर या दरोडेखोरांनी लोखंडी कटावणीने घराचा दरवाजा उचकटला आणि आत प्रवेश करत घरातील सदस्यांना धमकावत प्रतिभा साठे यांच्या गळ्यातील तसेच घरातील लोखंडी कपाटातील सुमारे दोन लाख १७ हजार रुपये किमतीचे दागिने पळवून नेले. जखमी पंढरीनाथ साठे यांना अहिल्यानगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, नगर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो.नि. गणेश वारुळे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
दरम्यान, चिचोंडी पाटील परिसरात काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, या चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच दरोड्याचा तातडीने तपास लावावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी दिला आहे.
Comments are closed.