शिवरायांचे अमात्य नारोपंत नीळकंठ यांची समाधी सापडली, इतिहास संशोधकांच्या प्रयत्नाला यश
छत्रपती शिवाजी महाराजांचे अमात्य नारोपंत नीळकंठ यांच्या समाधीचा शोध लावण्यात इतिहास संशोधकांना यश आले आहे. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील समाधी वृंदावनाचा ऐतिहासिक उलगडा झाला असून इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर आणि सुधागड तालुक्यातील संदीप परब यांनी सखोल अभ्यास केल्यामुळे ऐतिहासिक ठेवा सापडला आहे.
या महत्त्वपूर्ण शोधावर आधारित शोधनिबंध ‘कोकण इतिहास पत्रिका’ मध्ये प्रसिद्ध झाला असून याचे प्रकाशन नुकतेच वसईतील संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात झाले. कोकणच्या विशेषतः मराठा कालखंडातील इतिहासाच्या दृष्टीने हा शोध अत्यंत मोलाचा मानला जात आहे. या शोधनिबंधासाठी संशोधकांनी केवळ मौखिक परंपरांवर अवलंबून न राहता भक्कम ऐतिहासिक पुराव्यांची मांडणी केली आहे. यामध्ये ऐतिहासिक कागदपत्रे, उपलब्ध पत्राचार आणि समकालीन दप्तरांचा चिकित्सक अभ्यास केला आहे. यानुसार नारोपंत अमात्य यांची समाधी कुणकेश्वर मंदिरालगत असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे या परिसराशी आणि कुणकेश्वर देवालयाशी अमात्यांच्या वंशजांचा असलेला दीर्घकालीन संबंध या संशोधनातून अधोरेखित झाला आहे. हा शोधनिबंध इतिहासप्रेमी, संशोधक आणि अभ्यासकांसाठी एक महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ ठरेल. अधिक माहितीसाठी संपर्क रणजित हिर्लेकर : 9423303670, संदीप परबः 9930663559.
इतिहासाला नवी दिशा
नारोपंत नीळकंठ यांनी स्वराज्याच्या प्रशासनात अमात्य म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र त्यांच्या समाधी स्थानाबाबत अनेक वर्षे अनभिज्ञता होती. हिर्लेकर आणि परब यांच्या या प्रयत्नांमुळे आता कुणकेश्वर येथील त्या वृंदावनाला ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली आहे. या निष्कर्षांमुळे कोकणातील मराठा इतिहासाच्या अभ्यासाला एक नवे परिमाण मिळाले असून पर्यटनाच्या दृष्टीनेही या स्थानाचे महत्त्व वाढणार आहे.
Comments are closed.