तेच मैदान, तिच काळी माती! 3 वर्षात दुसऱ्यांदा टीम इंडिया पराभूत, पहिल्यांदाच झाले ‘असे’; सूर्याबद्दलही दुर्मिळ…

सध्या सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत गतविजेता आणि यजमान संघाला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी (२२ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खूपच हतबल दिसला आणि ३ वर्षापूर्वी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली.
भारताने सुपर-८ची सुरूवात पराभवाने केली. या सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभूत व्हावे लागले. यामुळे आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचा विजयी रथही रोकला गेला. याआधी भारताने आयसीसी स्पर्धांमधील लागोपाठ १७ सामन्यांत विजय मिळवला आणि आता या पराभवाने ही मालिका खंडीत झाली आहे. भारताने आयसीसी स्पर्धांमध्ये शेवटी पराभवाचा सामना २०२३च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात केला होता. आता तब्बल १७ सामन्यानंतर भारताला पुन्हा आयसीसी स्पर्धेतील सामना गमवावा लागला आहे. या दोन्ही सामन्यांमधील विशेष बाब म्हणजे हे दोन्ही सामने एकाच मैदानावर खेळले गेले.
भारतासाठी अहमदाबादचे हे मैदान अनलकी ठरत आहे. भारताने मागील तीन वर्षात आयसीसी स्पर्धांमधील केवळ दोन सामने गमावले आणि याच स्टेडियममध्ये हे दोन्ही सामने झाले होते. चकीत करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे दोन्ही सामन्यांसाठी काळ्या मातीचीच खेळपट्टी होती आणि सूर्यकुमारने दोन्हीमध्ये १८ धावा केल्या होत्या. २०२३मध्ये भारताने येथे ऑस्ट्रेलियाला २४० धावांचे लक्ष्य दिले होते आणि ६ विकेट्सने तो सामना गमावला होता. त्यामध्ये सूर्यकमारने १८ धावा केल्या होत्या. आता २०२६मध्ये पुन्हा असे झाले. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावा केल्या आणि भारत १११ धावांवर सर्वबाद झाला. यामध्येही सूर्यकुमारने १८ धावा केल्या.
भारताने मागील ३० आयसीसी स्पर्धांतील सामन्यांमध्ये केवळ दोन सामने गमावले आहेत. ज्यामध्ये काळ्या मातीच्या खेळपट्टीची मोठी भुमिका राहिली आहे. या दोन्ही गमावलेल्या सामन्यांमध्ये भारताची कामगिरी सारखीच राहिली. पॉवरप्लेमध्ये विकेट्स गमावणे, भागीदाऱ्या न होणे आणि दबावात येत चुकीचे शॉट्स खेळणे या गोष्टी भारताला नुकसानदायक ठरत आहेत.
या स्टेडियमध्ये भारताने वनडे विश्वचषक आणि टी२० विश्वचषकाबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीचाही एक सामना गमावला आहे. २००६मध्ये वेस्ट इंडिजने भारताला त्या सामन्यात ३ विकेट्सने पराभूत केले होते. यामुळे आता भारताच्या या मैदानावर भारताने तिन्ही आयसीसी स्पर्धांचे सामने गमावल्याचा विक्रम झाला आहे. हा एक दुर्मिळ विक्रम आहे.
Comments are closed.