ICC T20 WC -विल पॉवरसमोर लंकेचा फडशा, इंग्लिश गोलंदाजांनी यजमानांना 95 धावांत गुंडाळले
इंग्लंडची फलंदाजी पाहताना सुरुवातीला वाटलं, आज ‘साहेबां’ची दाणादाण उडणार, पण क्रिकेट हा सरळ रेषेचा खेळ नाही. इथे 146 धावांचाही डोंगर बनतो, जर गोलंदाजांकडे ‘विल पॉवर’ असेल तर. इंग्लंडने आपल्या विल जॅक्सच्या आणि अन्य गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा 95 धावांत फडशा पाडत 51 धावांनी धुव्वा उडवला आणि सुपर एटमध्ये खणखणीत सलामी दिली.
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजी घेतली आणि त्यांच्या फिरकीने इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवले. एकीकडे डुनिथ वेलागेने तीन विकेट टिपले, महेश तीक्षणा आणि दिलशान मधुशंका यांनी अचूक मारा करत इंग्लिश फलंदाजांना बेजार केले. इंग्लंडचा 20 षटकांत 9 बाद 146 हा स्कोअर पाहून लंकेच्या चाहत्यांनी विजयाचा फुगा फुगवला होता. पण त्यांना विसर पडला की, क्रिकेटमध्ये फुग्याला सुई लागायला वेळ लागत नाही.
फिल सॉल्टने 62 धावांची एकाकी झुंझार खेळी करत इंग्लंडच्या डावाला श्वास दिला. त्याच्याशिवाय कोणी खेळपट्टीवर उभं राहिलं नाही. पण सामना केवळ धावांनी जिंकला जात नाही; तो जिंकला जातो डावपेचांनी. ते इंग्लंडच्या गोलंदाजांनी दाखवून दिले.
147 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. 147 धावांचे लक्ष्य ही डोंगराएवढी मोठी गोष्ट भासू शकते, हे आज इंग्लंडने प्रत्यक्षात दाखवून दिले. जोफ्रा आर्चर आणि विल जॅक्सने पहिल्या सहा षटकांत 34 धावांत लंकेचा अर्धा संघ गारद करत लंकेची नौका बुडवली होती. ही अवस्था पाहून स्टॅण्डमध्ये स्मशानशांतता पसरली. निस्संका लवकर बाद झाला, शनाकाने 30 धावा करत काही काळ झुंज दिली; पण एकाकी लढाईत सेना जिंकत नाही.
विल जॅक्सने आघाडीचे तीन विकेट घेत लंकेचे कंबरडे मोडले. त्यानंतर त्यांचा कणा कुणीच ताठ करू शकला नाही. जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत शेवटची खिळ ठोकली.
Comments are closed.