ठाण्याच्या मेट्रो कारशेडविरोधात भूमिपुत्र रस्त्यावर; मोघरपाडावासीयांनी चुली पेटवल्या, ट्रॅक्टरही फिरवून आंदोलन छेडले
ठाणे मेट्रोच्या कारशेडविरोधात संतप्त मोघरपाडावासीय आज रस्त्यावर उतरले. त्यांनी आपल्या जमिनीवर चुली पेटवून आणि ट्रॅक्टर फिरवून आंदोलन छेडले. दरम्यान कारशेडसाठी शासनाने जागा निश्चित केली असली तरी अद्याप आम्हाला मोबदला दिलेला नाही. आधी जागेचा मोबदला द्या, नोकऱ्यांचे आश्वासन द्या आणि त्यानंतर आमच्या शेतात पाऊल ठेवा, अशी मागणी आंदोलकांनी करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रश्न पेटणार आहे.
वडाळा घाटकोपर ते ठाणे कासारवडवली मेट्रोसाठी घोडबंदर परिसरातील मोघरपाडा येथील 174.01 हेक्टरवर कारशेड उभारण्यात येणार आहे. या संपूर्ण क्षेत्रावर 1960 पासून स्थानिक भूमिपुत्र शेती करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. एकूण 167 भाडेपट्टेधारक शेतकरी व 31 अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सिडकोच्या धर्तीवर विशेष नुकसानभरपाई देण्यासाठी शासनाने धोरण तयार केले आहे. त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. विरोध डावलून एमएमआरडीएने मेटोच्या कारशेडसाठी 167 सातबारावरील शेतकऱ्यांची नावे कमी केली आहेत. तसेच पोलीस बळाचा वापर करून मध्यरात्री शेतकऱ्यांना नोटिसा बजावून बळजबरीने भूसंपादन करण्यात आले. स्थानिक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. हा मोबदला कागदावरच असल्याने कारशेडच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज शेत बांधावर ठिय्या मांडला. योग्य मोबदला दिला नाही तर आम्ही शेती देणार नाही यावर आमचा रोजगार आहे. वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. किरण पाटील, संजय पाटील, निखिल ठाकूर यांच्यासह शेकडो भूमिपुत्र या आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या मागण्या कोणत्या?
प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या स्थानिक मुलांना नोकरीत प्राधान्य द्या, 5 एकर जमिनीवर शाळा कॉलेज बांधण्यात यावे, मेट्रोमध्ये लागणाऱ्या सेवेसाठी योग्य ते प्रशिक्षण स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना देऊन प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीत 100 टक्के प्रशिक्षण देण्यात यावे आदी मागण्या संतप्त शेतकऱ्यांनी केल्या.
- मोघरपाडा येथील शेतकऱ्याच्या नावे जमीन असून कसत असलेल्या शेतकऱ्यांना 22.5 टक्के व शेतजमीन ताब्यात असणाऱ्या शेतकऱ्यांना 12.5 टक्के मोबदला देण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
- काही शेतकऱ्यांकडे 64 गुंठ्यांपेक्षा जास्त जमीन ताब्यात असून त्यावर शेती व्यवसाय करत असल्याने नक्की किती जमिनीचा मोबदला मिळणार, हा मोबदला देत असताना जमीन नक्की कुठे देणार, कशा स्वरूपात देणार?
- जी जमीन शासनाकडून शेतकऱ्याला मिळणार त्या जमिनीवर किती क्षेत्रफळाचे बांधकाम होणार आहे, याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही.
Comments are closed.