आयपीएलसारखा विचार वर्ल्डकपमध्ये चालणार नाही! अक्षरला न घेतल्याने दिग्गज फिरकीपटूने भारताच्या रणनीतीवर निर्माण केले प्रश्न

भारताला आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पहिला पराभव मिळाला. रविवारी (२२ फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेने भारताला त्यांच्या पहिल्या सुपर-८च्या सामन्यात ७६ धावांनी पराभूत केले. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम अकरामध्ये एकही बदलाव दिसला नाही. तसेच भारताचा उपकर्णधार अक्षर पटेलच बाकावर दिसला. यामुळे भारताच्या दिग्गज फिरकीपटूने नाराजी व्यक्त केली आहे.
आर अश्विनने अक्षर जो मॅच विनर आणि महत्वाचा खेळाडू असून त्याला बाहेर बसवल्याने नाराजी दर्शवली. यावर अश्विन त्याच्या युट्युबवरील ‘ऍश की बात’ या कार्यक्रमामध्ये म्हटले, “आयपीएलमध्ये संघ बदलणे चांगले कारण तेथे तुम्हाला १४ सामने खेळायचे आहेत, याबाबत मी सहमत आहे. परंतु अशा आयसीसी स्पर्धांमध्ये, तुम्ही संघ जितका स्थिर ठेवू शकाल तितके चांगले,”
“वॉशिंग्टन सुंदरला डावखुऱ्या फलंदाजाविरुद्ध खेळण्यास आणले आहे, याबाबत मी १०० टक्के सहमत आहे. अक्षर मात्र टी२० मधील महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याने संघाच्या अनेक विजयांमध्ये मोलाची भुमिका निभावली आहे”, असेही अश्विनने पुढे म्हटले आहे.
अक्षरने २०२४च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ४७ धावांची खेळी केली होती. याचा उल्लेख करत अश्विन म्हणाला, “अक्षरने मागील विश्वचषकात काय केले होते, हे विसरुन चालणार नाही. त्या सामन्यातही भारताची स्थिती चांगली नव्हती. तेव्हा अक्षरने विराट कोहलीसोबत उत्तम भागीदारी करत संघाला १७०च्या पुढे नेले. त्यामध्ये विराटचा अनुभव होताच, मात्र अक्षरनेही काही कमी कामगिरी केली नाही. सध्याच्या सामन्यात जर भारताकडे काही विकेट्स शिल्लक असत्या आणि मधल्या षटकामध्ये काही स्थिरता असती तर भारताने नक्कीच लक्ष्य गाठले असते.”
अक्षरने २०२४च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटसोबत चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली होती. जी तो विश्वचषक जिंकण्यात महत्वाची ठरली कारण त्याआधी भारताची स्थिती ३४ धावांवर ३ विकेट्स अशी होती. कालच्या (२२ फेब्रुवारी) सामन्यात सुंदरला पाठवले गेले आणि तो धावा करण्यात अपयशी ठरला.
Comments are closed.