ठाण्याच्या सुपरस्पेशालिटी सिव्हिल रुग्णालयाचे लोकार्पण लटकले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांच्या उपचारासाठी एकमेव असलेले ठाण्याचे सिव्हिल हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात आहे खरे. मात्र काही प्रशासकीय मान्यता अद्याप मिळाल्या नसल्याने ठाण्याच्या सुपरस्पेशालिटी सिव्हिल रुग्णालयाचे लोकार्पण लटकले आहे. प्रशासकीय मान्यतेची पूर्तता करूनच रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले करण्यात येणार असल्याने आणखीन चार महिने रुग्णांची फरफट होणार आहे.

ठाणे जिल्ह्याचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून सिव्हिल हॉस्पिटल ओळखले जाते. जिल्ह्यामध्ये 6 महानगरपालिका, 2 नगर परिषद व 2 नगरपंचायत तसेच दुर्गम भागातील टोकावडे, मुरबाड, शहापूर पालघर, रायगड जिल्ह्यातील गरजू रुग्ण ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात येतात. त्यामुळे ठाण्यात सिव्हिल हॉस्पिटलचे सुपरस्पेशालिटीमध्ये रूपांतर करण्यात आले असून सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 900 बेड असलेल्या मल्टिस्पेशालिटी ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे उद्घाटन 9 फेब्रुवारीला करण्यात येणार होते. मात्र यामध्ये काही प्रशासकीय मान्यता बाकी असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

  • 1936 साली दानतपस्वी नारायण विठ्ठल सायन्ना यांनी ही इमारत आपले वडील विठ्ठल सायन्ना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णालयासाठी दान केली होती.
  • 22 एप्रिल 2023 रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिव्हिलच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन झाले होते.
  • 18 महिन्यांत रुग्णालय उभारण्याचे जाहीर करण्यात आले होते. रुग्णालयावरील हेलिपॅड आदी खास सुविधांच्या उभारणीमुळे कामाला विलंब झाला. तर आता प्रशासकिय मान्यता अभावी रुग्णालयाचे लोकार्पण रखडले आहे.

Comments are closed.