US Tariff – न्यायालयाने शुक्रवारी ट्रम्प यांना दिला मोठा धक्का; मंगळवारपासून टॅरिफ वसुली थांबवणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानसह अनेक देशांवर लावलेले टॅरिफ अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवत ते  रद्द केले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. याप्रकरणी आता मोठी माहिती समोर येत आहे. अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा संरक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, अमेरिका मंगळवारपासून या रद्द करण्यात आलेल्या अतिरिक्त शुल्कांची वसुली पूर्णपणे थांबवणार आहे.

अमेरिकन प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 1977 च्या ‘इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ॲक्ट’ (IEEPA) अंतर्गत केली जाणारी टॅरिफ वसुली मंगळवारी स्थानिक वेळेनुसार रात्री 12.01 वाजता म्हणजेच हिंदुस्थानी वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता बंद होईल. या संदर्भात आयातदारांना विशेष सूचना देण्यात आल्या असून, कार्गो सिस्टममधील संबंधित सर्व ड्युटी कोड (Duty Code) निष्क्रीय करण्यात येणार आहेत. यामुळे जागतिक बाजारपेठेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ IEEPA अंतर्गत लावण्यात आलेल्या शुल्कांसाठी लागू आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा शक्तीच्या कलम 232 आणि अनुचित व्यापार कायद्याच्या कलम 301 अंतर्गत लादलेले इतर शुल्क अद्यापही कायम राहतील. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अवघ्या तीन दिवसांत अमेरिकन सरकारने ही अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे अमेरिकन सरकारच्या महसुलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, या बेकायदेशीर ठरवलेल्या टॅरिफमधून अमेरिका दररोज 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई करत होती. आता जवळपास 175 अब्ज डॉलर्सचा महसूल परत करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, आतापर्यंत वसूल केलेली रक्कम आयातदारांना परत केली जाणार की नाही, याबाबत अमेरिकन सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

अमेरिका टॅरिफ रिफंड देणार? यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने दिली महत्त्वाची माहिती

Comments are closed.