सुपर-8 चं मैदान गाजवण्यासाठी दिग्गज सज्ज! गौतम गंभीर, डॅरेन सॅमी आणि मलिंगा यांच्या मार्गदर्शनाखाली भिडणार संघ

टी२० वर्ल्डकपचा सुपर८ हा महत्त्वपूर्ण टप्पा सुरू झाला आहे. २० संघांसह सुरू झालेली ही स्पर्धा आता ८ संघांपुरती मर्यादित झाली आहे. भारत, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि झिमाब्ब्वे एका गटात आहेत तर इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि पाकिस्तान दुसऱ्या गटात आहेत. दोन्ही गटातून दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. टी२० वर्ल्डकपचं जेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने प्रत्येक बोर्डाने मुख्य प्रशिक्षकाच्या बरोबरीनेत दमदार ताफा पाठवला आहे.
भारतीय संघाचं प्रशिक्षकपद गौतम गंभीर यांच्याकडे आहे. २००७ मध्ये भारतीय संघाने पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकप जेतेपदावर कब्जा केला होता. त्या संघाचा गंभीर अविभाज्य भाग आहे. फायनलमध्ये त्यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली होती. २०११ वनडे वर्ल्डकपविजेत्या संघाचाही गंभीर महत्त्वाचा भाग होता. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग बाद झाल्यानंतर गंभीरनेच ९७ धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला होता. गंभीर आणि धोनी यांच्यातील भागीदारीने टीम इंडियाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. गंभीर यांच्याबरोबरीने सितांशू कोटक, रायन टेन डुस्काटा आणि मॉर्ने मॉर्केल भारताच्या सपोर्ट स्टाफमध्ये आहेत. डोमेस्टिक क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेले कोटक फलंदाजांना त्यांच्या खेळातील बारकावे पक्के करण्यासाठी मदत करतात. सौराष्ट्रचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं. भारतीय अ संघाचेही ते प्रशिक्षक होते. नेदरलँड्सचे रायन डेन डुस्काटा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करतात. दक्षिण आफ्रिकाचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केल गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, व्हरनॉन फिलँडर या धडकी भरवणाऱ्या आक्रमणाचा मॉर्ने भाग होता. त्याचा अनुभव भारतीय गोलंदाजांसाठी अतिशय उपयुक्त ठरतो आहे.
दक्षिण आफ्रिकेचं प्रशिक्षकपद शुक्री कॉनरॉड यांच्याकडे आहे. कॉनरॉड यांच्या मार्गदर्शनात दक्षिण आफ्रिका संघाने जोरदार भरारी घेतली आहे. परखडपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कॉनरॉड यांनी दक्षिण आफ्रिका संघावरचा चोकर्स हा शिक्का पुसण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या बरोबरीने माजी खेळाडू अॅशवेल प्रिन्स, पिइट बोथा, क्रुगर व्हॅन व्हॅक कोचिंग तुकडीचा भाग आहेत. आव्हानात्मक खेळपट्ट्या आणि दर्जेदार गोलंदाजी यांचा सामना करण्यादृष्टीने प्रिन्स यांचं मार्गदर्शन उपयुक्त आहे. या सगळ्यांच्या बरोबरीने दक्षिण आफ्रिकेने अॅल्बी मॉर्केललाही कंसल्टंट म्हणून नियुक्त केलं आहे. अष्टपैलू अल्बी तूर्तास गोलंदाजांना मदत करतो आहे.
वेस्ट इंडिजच्या मार्गदर्शनाची धुरा वर्ल्डकपविजेता कर्णधार डॅरेन सॅमी याच्याकडे आहे. वेस्ट इंडिजने २०१२ आणि २०१६ मध्ये सॅमीच्याच नेतृत्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं. टी२० क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव सॅमीकडे आहे. प्रेरणादायी व्यक्तिमत्व असणारा सॅमी उत्तम वक्तृत्वासाठीही ओळखला जातो. सॅमीच्या बरोबरीने फ्लॉइड रायफर, रवी रामपॉल आणि रायन ग्रिफिथ वेस्ट इंडिजच्या कोचिंग ताफ्याचा भाग आहेत.
श्रीलंकेचा सपोर्ट स्टाफ सर्वाधिक स्टारडममय म्हटल्यास वावगं ठरू नये. नव्वदच्या दशकात आपल्या अष्टपैलू खेळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा सनथ जयसूर्या श्रीलंकेचा कोच आहे. वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या १५ षटकात जोरदार फटकेबाजीने सामन्याचा चित्र पालटवणारा जयसूर्या क्रिकेटरसिकांच्या आजही स्मरणात आहे. १९९६ मध्ये वनडे वर्ल्डकपविजेत्या संघाचा जयसूर्या अविभाज्य घटक होता. जयसूर्याच्या बरोबरीने भेदक गोलंदाजीचा बादशहा लसिथ मलिंगा बॉलिंग कोच म्हणून कार्यरत आहे. २०१४ मध्ये मलिंगाच्याच नेतृत्वात श्रीलंकेने टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. या दोघांच्या बरोबरीने भारताचे विक्रम राठोड आणि आर.श्रीधर श्रीलंकेकडे आहेत. भारताचे बॅटिग कोच तसंच इंडिया अ आणि आयपीएल संघांचं प्रशिक्षकपद भूषणवण्याचा तगडा अनुभव राठोड यांच्याकडे आहे. भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारण्यात मोलाचा वाटा असणारे आर.श्रीधर आता श्रीलंकेच्या खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत.
पाकिस्तानची सूत्रं न्यूझीलंडच्या माईक हेसन यांच्याकडे आहेत. हेसन यांनी न्यूझीलंडला प्रगतीपथावर आणलं आहे. आयपीएल स्पर्धेत आरसीबी संघाला मार्गदर्शन केलं आहे. हेसन यांच्याबरोबरीने माजी खेळाडू आकिब जावेद आणि हनफ मलिक हे पाकिस्तानच्या कोचिंग टीमचा ते भाग आहेत.
इंग्लंड संघाच्या मार्गदर्शनाची धुरा ब्रेंडन मॅक्युलम यांच्याकडे आहे. आक्रमक पवित्र्यासाठी खेळण्याची शैली घालून देणारे मॅक्युलम बॅझ नावाने प्रसिद्ध आहेत. या शैलीला बॅझबॉल असं म्हटलं जातं. २००८ मध्ये आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत मॅक्युलमने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळताना १५८ धावांची झंझावाती खेळी केली होती. एकप्रकारे मॅक्युलम यांच्या खेळीने आयपीएलचा पाया रचला. टी२० क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव मॅक्युलम यांच्याकडे आहे. त्यांच्या बरोबरीने पॉल कॉलिंगवूड आणि मार्कस ट्रेस्कॉथिक हे मॅक्युलम यांच्या टीमचा भाग आहेत. २०१० मध्ये इंग्लंडने टी२० वर्ल्डकप जेतेपद पटकावलं. कॉलिंगवूड त्या संघाचा भाग होते. इंग्लंडच्या अव्वल सलामीवीरांमध्ये ट्रेस्कॉथिक यांचं नाव घेतलं जातं. फिरकीपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी इंग्लंडने जीतन पटेल यांची नियुक्ती केली आहे. जीतन प्रदीर्घ काळ इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळले. यांच्याबरोबरीने डेव्हिड सेकर कोचिंग टीमचा भाग आहेत.
झिमाब्वे संघाने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या बलाढ्य संघांना नमवत सुपर८ फेरी गाठली. झिम्बाब्वेच्या या वाटचालीत प्रशिक्षक जस्टीन सॅमन्स यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या बरोबरीने माजी खेळाडू डिऑन इब्राहिम कोचिंग टीममध्ये आहेत. झिम्बाब्वेने टी२० वर्ल्डकपसाठी महान गोलंदाज कोर्टनी वॉल्श यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. वॉल्श यांचा प्रदीर्घ अनुभव झिम्बाब्वेच्या युवा गोलंदाजांना अतिशय उपयुक्त ठरत आहे.
न्यूझीलंड संघाने रॉब वॉल्टर यांच्याकडे प्रशिक्षकपद सोपवलं आहे. त्यांच्याबरोबरीने ल्यूक राँची, जेकब ओरम आणि जेम्स फोस्टर हे कोचिंग टीमचा भाग आहेत.
Comments are closed.