मोहम्मद आमिरच्या निशाण्यावर पुन्हा अभिषेक शर्मा; पाकिस्तानी गोलंदाजाचे वक्तव्य चर्चेत

टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये अभिषेक शर्माची बॅट पूर्णपणे शांत दिसली आहे. चार सामन्यांमध्ये अभिषेकने केवळ १५ धावा केल्या आहेत. सुरुवातीच्या तीन सामन्यांत अभिषेक सलग शून्यावर बाद झाला होता. अभिषेकच्या या खराब फॉर्मच्या दरम्यान पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरचे एक विवादित वक्तव्य समोर आले होते. आमिरने अभिषेकला ‘स्लॉगर’ म्हणजेच ‘लप्पेबाज’ म्हटले होते.
आता आमिरने अभिषेकबाबत दुसरे वक्तव्य केले आहे. मात्र, यावेळी आमिरचे सूर बदललेले दिसले. आपल्या मागील वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना आमिर म्हणाला की, भारतीय फलंदाजाला कमी लेखण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता.
’हारना मना है’ या शोमध्ये अभिषेक शर्माबद्दल बोलताना मोहम्मद आमिर म्हणाला, “मी एका गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून त्याच्याबद्दल बोलत होतो. मी त्याच्या तंत्राबद्दल (Technique) भाष्य करत होतो. मी ‘स्लॉगर’ हा शब्द वापरल्यामुळे लोकांना वाईट वाटले.”
आमिर पुढे म्हणाला, “माझा सांगण्याचा अर्थ असा होता की, त्याचे तंत्र असे आहे की एखादा चांगला संघ किंवा चांगल्या गोलंदाजांचा गट त्याला जाळ्यात अडकवू शकतो. त्याने केलेल्या १५ धावा पहा, त्याने त्या सर्व धावा एकाच बाजूला केल्या आहेत. त्याने ज्या चेंडूंवर फटके मारले, ते खराब चेंडू होते. पण जेव्हा रबाडाने चांगली गोलंदाजी सुरू केली, तेव्हा त्याला त्याचा फायदा घेता आला नाही.”
आमिर म्हणाला, “एक वरिष्ठ खेळाडू म्हणून जर माझा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचला, तर मी त्याला सांगेन की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुझ्या तंत्राची पोलखोल झाली आहे. जर तू थोडा संयम दाखवला आणि चेंडूच्या गुणवत्तेनुसार खेळलास, तर ते अधिक चांगले होईल. त्याच्याकडे कौशल्य आहे, पण तो त्याचा किती प्रभावीपणे वापर करतो यावर सर्व अवलंबून आहे. मी याच संदर्भात ते भाष्य केले होते, पण लोकांना त्याचे वाईट वाटले.”
Comments are closed.