20 वर्षांत 200 वाघांची अवैध शिकार – TMarathiNews
आरटीआयमधून खुलासा : मध्यप्रदेशात सर्वाधिक प्रमाण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टायगर स्टेट म्हणून मध्यप्रदेशला ओळखले जाते, भारतात सर्वाधिक वाघ याच राज्यात आढळून येतात, परंतु 20 वर्षांमध्ये याच राज्यात वाघांची सर्वाधिक अवैध शिकार करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा खुलासा आरटीआयच्या माध्यमातून झाला आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधीन वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोकडून प्राप्त माहितीच्या अधिकारात हे उत्तर मिळाले आहे.
आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार 2005-25 दरम्यान पूर्ण भारतात जवळपास 200 वाघांची अवैध शिकार झाली. यात मध्य भारत एक प्रमुख केंद्र असल्याचे दिसून आले आहे. आकडेवारीतून एकूण अवैध शिकारप्रकरणांपैकी 59 वाघांची शिकार मध्य भारतातील जंगलांमध्ये झाली आहे. ब्युरोकडून पुरविण्यात आलेल्या राज्यनिहाय आकडेवारीनुसार वाघांच्या अवैध शिकारीच्या सर्वाधिक घटना मध्यप्रदेशात घडल्या आहेत. मागील 20 वर्षांमध्ये मध्यप्रदेशात सर्वाधिक 36 वाघांना अवैधपणे मारून टाकण्यात आले आहे. या यादीत मध्यप्रदेशानतंर उत्तरप्रदेशचे स्थान आहे.
राज्यनिहाय वाघांची अवैध शिकार
राज्य शिकार ठरलेले वाघ
मध्य प्रदेश 36
उत्तर प्रदेश 14
कर्नाटक १३
महाराष्ट्र 09
आसाम 06
उत्तराखंड ०४
केरळ 04
तामिळनाडू 03
छत्तीसगड 03
आंध्र प्रदेश 03
लैंगिक तस्करी संबंध
वन्यजीव तज्ञांनी या हत्यांना शरीराच्या अवयवांच्या आंतरराष्ट्रीय मागणीशी जोडले आहे. डॉ. वाय. व्ही. झाला हे इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचरमध्ये वाघविषयक तज्ञ आणि भारतीय वन्यजीव संस्थेचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक आणि डीन राहिले आहेत. त्यांनी ही आकडेवारी चिंताजक असल्याचे सांगितले आहे. शिकार करण्यात आलेल्या वाघ आणि बिबट्यांपैकी केवळ एक छोटासा हिस्साच अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात येत असतो. कठोर कायद्यांनंतरही वाघांचे अवयव आणि उत्पादनांची मागणी सातत्याने जारी आहे. खासकरून ही मागणी चीन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये कायम आहे. अशास्थितीत शिकारी वाघाची अवैध शिकार करतात. ही आकडेवरी या राज्यांमध्ये जप्त अवशेषांची संख्या दर्शविते, शिकारीची वस्तुस्थिती दाखवत नसल्याचे झाला यांनी स्पष्ट केले आहे.
भारतात सुमारे 3600 वाघ
भारतात जवळपास 3600 वाघ असून वाघांच्या जागतिक संख्येच्या जवळपास 75 टक्के हे प्रमाण आहे. ही माहिती पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून जारी भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अलिकडच्या व्याघ्रगणनेच्या अनुमानाशी निगडित आहे. वाघ असलेल्या जंगलांमध्ये जवळपास 13,800 बिबटे आहेत. आरटीआय डाटामधून याच कालावधीत 92 बिबट्यांची शिकार झाल्याचे कळते.
बिबट्यांवरून आकडेवारी
बिबट्यांची सर्वाधिक शिकार हिमाचलप्रदेशात झाली असून येतो 21 बिबटे मारले गेले आहेत. त्यानंतर आंध्रप्रदेशात 8, जम्मू-काश्मीरमध्ये 6, पंजाबमध्ये 5, उत्तरप्रदेशात 5, उत्तराखंडमध्ये 5, मध्यप्रदेशात 5 आणि तामिळनाडूत 5 बिबट्यांची शिकार झाली आहे. बिबट्यांच्या शिकारीची जवळपास 35 टक्के प्रकरणे हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड या पर्वतीय राज्यांमध्ये घडली आहेत. ही आकडेवारी वनक्षेत्रांचे विखंडन, वन्यजीव मार्गिकेवरील अतिक्रमण आणि वाघांच्या अधिवासात झालेल्या वृद्धीशी निगडित मानव-वन्यजीव संघर्षात संभाव्य वृद्धीचा संकेत देते.
Comments are closed.