निष्क्रिय पीएफ खात्यांमध्ये ठेवीदारांना पैसे मिळतील
‘ईपीएफओ’कडून तयारी : लाखो खातेधारकांना लाभ अपेक्षित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कामगारांच्या हिताच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत निष्क्रिय खात्यांमधील रक्कम ठेवीदारांना अदा करण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे लाखो लोकांना फायदा होणार आहे. तूर्तास मंत्रालयाने ईपीएफओशी जोडलेल्या निक्रिय पीएफ खात्यांमध्ये ठेवलेल्या लहान ठेवी परत करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, खातेधारकांना हा परतावा मिळविण्यासाठी कोणतेही कागदपत्रे पूर्ण करण्याची आवश्यकता नाही.
देशभरातील अनेक कामगारांच्या जुन्या खात्यांमध्ये वर्षानुवर्षे थोडीफार रक्कम पडून आहे. रक्कम मिळविण्याच्या जटील प्रक्रियेमुळे बऱ्याच ठेवीदारांनी ती प्राप्त करण्यासाठी धडपड केलेली नसली तरी आता खातेधारकांना ती रक्कम विनासायास मिळणार आहे. कामगार मंत्रालयाचा हा निर्णय 1,000 किंवा त्यापेक्षा कमी रक्कम असलेल्या निक्रिय पीएफ खात्यांना लागू होतो. ईपीएफओ कोणत्याही कागदपत्रांशिवाय जमा केलेली रक्कम परत करेल. खातेधारकांना कोणताही अर्ज सादर करण्याची किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही, कारण या खात्यांमधील निधी थेट संबंधित बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयाचा उद्देश वर्षानुवर्षे या खात्यांमध्ये पडून असलेले न वापरलेले पैसे परत आणणे आहे.
31 लाख खात्यांची ओळख निश्चित
सध्या, निष्क्रिय स्वरुपात असलेल्या सुमारे 31 लाख निक्रिय ईपीएफओ खात्यांची ओळख पटली आहे. यापैकी, अंदाजे 6 लाख खात्यांमध्ये 1,000 किंवा त्यापेक्षा कमी रक्कम आहे. सदर रक्कम तात्काळ प्रभावाने आधारशी जोडलेल्या खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाणार आहे. तर उर्वरित निधी विविध हप्त्यांमध्ये परत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पायलट प्रोजेक्ट म्हणून परतफेड
कामगार मंत्रालयाचा हा निर्णय लाखो पीएफ खातेधारकांना थेट दिलासा देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जाते. तथापि, सध्या ते पायलट प्रोजेक्ट म्हणून अंमलात आणले जात आहे. ही पद्धत प्रभावी ठरली तर उर्वरित 25 लाख निक्रिय खात्यांसाठीही हेच मॉडेल लागू केले जाऊ शकते.
कोणती खाती निष्क्रिय मानली जातात?
सलग तीन वर्षे (36 महिने) ईपीएफओ खात्यात कोणताही व्यवहार किंवा क्रियाकलाप नसेल तर ते निक्रिय मानले जाते. याचा अर्थ असा की या खात्यांमध्ये कोणतेही योगदान किंवा दावे केले गेले नाहीत. तथापि, निक्रिय खाते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. हे करण्यासाठी नवीन नोकरीत सामील झाल्यावर जुना युएएन नंबर नवीन नियोक्त्याशी लिंक केला जाणे अत्यावश्यक आहे.
Comments are closed.