रणजीचा जेतेपद संग्राम आजपासून, कर्नाटकाच्या अनुभवाकडे अन् कश्मीरच्या जिद्दीकडे सर्वांचे लक्ष

हुबळीच्या मैदानावर मंगळवारपासून सुरू होणारा हा सामना फक्त अंतिम सामना नाही, तर इतिहास आणि जिद्दीची टक्कर आहे. 67 वर्षांच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठणारा जम्मू-कश्मीर संघासमोर आठ वेळा विजेतेपद पटकावलेला दिग्गज कर्नाटक संघ उभा आहे. एका बाजूला परंपरेचा दरारा, दुसऱया बाजूला संघर्षाची ठिणगी पडणार आहे. प्रश्न इतकाच आहे की, अनुभव जिंकेल की जिद्द बाजी मारेल? अवघ्या हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे रणजीच्या जेतेपद संग्रामाकडे.

श्रेयस गोपाल नवा समस्यानिवारक

या मोसमात जर एखादा खेळाडू ‘एक्स-फॅक्टर’ ठरला असेल तर तो म्हणजे श्रेयस गोपाल. 46 विकेट आणि 442 धावा. हा केवळ आकडा नाही, तर कर्नाटकच्या विजयगाथेचा कणा आहे. अडचणीत सापडलेल्या संघाला बाहेर काढण्याची त्याची कला विलक्षण आहे. माजी कर्णधार आर. विनय कुमार यांनीही त्याच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले आहे.

कर्नाटकचा दरारा – इतिहास, फॉर्म आणि फटकेबाजी

कर्नाटकला ‘फेव्हरेट’ ही उपाधी केवळ भूतकाळामुळे मिळालेली नाही. या मोसमात त्यांनी दाखवलेली सातत्यपूर्ण कामगिरी ही त्यामागची खरी ताकद आहे. राजकोटमध्ये सौराष्ट्रविरुद्ध ढासळलेला डाव त्यांनी जिद्दीने सावरला आणि त्यानंतर मुंबई व उत्तराखंडसारख्या बलाढय़ संघांना नमवून आत्मविश्वासाचा डंका पिटला. केएल राहुल केवळ 3 सामनेच खेळला, पण त्याने 91 धावांच्या सरासरीने 457 धावा ठोकल्या. दुसरीकडे करुण नायरने 699 धावा काढल्या आहेत तर रविचंद्रन स्मरण 50 धावा करताच हजारी गाठेल. देवदत्त पडिक्कलच्या बॅटीतून 532 धावा निघाल्या आहेत. मयंक अग्रवालने नेतृत्व सोडल्यानंतर पडिक्कलने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि परिपक्वतेची छाप उमटवली. ही फलंदाजी म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

जम्मू-कश्मीरची जिद्द – वेगवान गोलंदाजीचे झंझावात

इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणाऱया जम्मू-कश्मीरची ताकद म्हणजे त्यांची गोलंदाजी. वेगवान गोलंदाज औकिब नबीने या मोसमात तब्बल 55 विकेट घेतले आहेत. सकाळच्या सत्रात खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली तर कर्नाटकच्या बलाढय़ फलंदाजांची खरी कसोटी लागेल. अनुभवी कर्णधार पारस डोगरा आणि प्रशिक्षक अजय शर्मा संघाला शांत, संयमी आणि लढाऊ ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही केवळ लढत नाही, तर आत्मसन्मानाची झुंज आहे.

अनुभवाविरुद्ध उत्साह

राहुल, करुण, श्रेयस आणि मयंक यांना 2013-14 व 2014-15 मधील विजेतेपदाचा अनुभव आहे. मोठय़ा सामन्यांचे दडपण पचवण्याची त्यांची क्षमता कर्नाटकसाठी मोठा प्लस पॉइंट आहे. पण अंतिम फेरीत इतिहास नव्हे, तर त्या दिवशीचा खेळ निर्णायक ठरतो. जम्मू-कश्मीरचा उत्साह जर उसळला तर कर्नाटकच्या दराऱयालाही तडे जाऊ शकतात.

संभाव्य संघटन –

कर्नाटक – देवदत्त पडिक्कल (कर्णधार), मयंक अगरवाल, के. एल. राहुल, करुण नायर, के. व्ही. अनीश, आर. स्मरण, श्रेयस गोपाल, कृतिक कृष्णा, वैसाख विजयकुमार, विद्याधर पाटील, विद्वथ कावेरेप्पा, प्रसिध कृष्णा, मोहसिन खान, शिखर शेट्टी, के. एल. श्रीजित.

जम्मू आणि काश्मीर – पारस डोगरा (कर्नाधर), अब्दुल समद, शुभम खजुरिया, कामरान इक्बाल, आबिद मुश्ताक, विवरांत शर्मा, रोहित शर्मा, उमरान मलिक, युधवीर सिंग, औकिब नबी, सुनील कुमार, लोन नसीर, मुजतबा युसूफ, मुसैफ अझाज, साहिल लोत्रा, वंशज शर्मा, उमर नजीर, उमर नजीर, मिरन नजीर.

Comments are closed.