तृणमूल काँग्रेस जनतेची फसवणूक करत आहे.
पंतप्रधान मोदी यांचे पश्चिम बंगालच्या जनतेला पत्र
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘तृणमूल काँग्रेस’ने ‘शोनार बांगला’च्या जनतेची घोर फसवणूक केली आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेसाठी लिहिलेल्या एका मुक्त पत्रात केला आहे. राज्यात येत्या दोन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेल्या या पत्राची चर्चा होत आहे. पत्राला प्रारंभ त्यांनी ‘जॉय काली माँ’ अशा भावोत्कट शब्दांमध्ये केला आहे.
तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या जनतेला अनेक लाभांपासून वंचित ठेवले आहे. या सोन्यासारख्या आणि समृद्ध बनण्याची क्षमता असलेल्या राज्यातील जनतेला यापेक्षा अधिक सक्षम सरकारची आवश्यकता आहे. या राज्याचा सर्वांगिण विकास घडवून आणण्याची क्षमता आणि दृष्टी केवळ भारतीय जनता पक्षाकडेच असून या पक्षाला मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी पत्रात केले आहे.
‘विकसीत पश्चिम बंगाल’चे आश्वासन
पश्चिम बंगाल राज्याचे भवितव्य अधिक उज्ज्वल करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील मतदारांनी आम्हाला संधी दिल्यास या राज्याचा कायापालट घडविल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पश्चिम बंगालचे एका वैभवी आणि समाधानी राज्यात रुपांतर करण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षातच आहे. या राज्याची भविष्यातील दिशा नेमकी कोणती असेल, हे निर्धारीत करण्याचा अधिकार केवळ या राज्यातील मतदारांचाच आहे. त्यांनी या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विजयी केल्यास आही विकासाचे शिवधनुष्य पेलावयास सज्ज आहोत. येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करताना याचा विचार आवश्य केला जावा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
वैभवी गतकाळ
भारताला स्वातंत्र मिळाले, तेव्हा पश्चिम बंगाल हे राज्य भारतातले प्रथम क्रमांकाचे औद्योगिक राज्य होते. तथापि गेल्या 65 वर्षांमध्ये या राज्यात अशी सरकारे आली, की ज्यांनी राज्याचा औद्योगिक पाया स्वत:च्या संकुचित धोरणांमुळे उखडून टाकला. अत्यंत नकारात्मक आर्थिक धोरणांमुळे राज्यातील अनेक मोठे उद्योग बंद पडले किंवा राज्याबाहेर गेले. राज्यात बेरोजगारी आणि गरीबीचे थैमान आहे. रोजगारासाठी राज्यातील लक्षावधी तरुणांना नाईलाजाने अन्य राज्यांमध्ये स्थलांतरीत व्हावे लागले आहे. राज्याचे गतवैभव नष्ट झाले. ते पुन्हा मिळवायचे असेल, तर राज्याच्या राजकीय व्यवस्थेत परिवर्तन आवश्यक आहे. ते जनतेने घडवावे. भारतीय जनता पक्षाला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
2.83 लाख कोटीचे साहाय्य
केंद्र सरकारने पश्चिम बंगाल या राज्याला गेल्या 10 वर्षांमध्ये किती साहाय्य केले याची माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रात दिली आहे. केंद्र सरकारच्या ‘जनधन’ योजनेचा या राज्याला मोठा लाभ झाला. या राज्यातील छोटे व्यापारी आणि लघु उद्योजक यांना गेल्या 11 वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून 2 लाख 83 हजार कोटी रुपयांचे धनसाहाय्य देण्यात आले आहे. या राज्यातील दीड कोटी गरीब घरांना विनामूल्य गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच विधवा निवृत्तीवेतन आणि दिव्यांग साहाय्यता निधीतून असंख्य गरीबांना साहाय्यता मिळाली आहे. या राज्यातील जनतेसाठी केंद्र सरकारने तीन मुख्य कल्याणकारी योजनांच्या माध्यमांमधून साहाय्य केले आहे. राज्यातील जनतेला याची कल्पना असून मतदार या निवडणुकीत मतदान करताना याची जाणीव निश्चितच ठेवणार आहेत. सक्षम सरकार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सातत्यपूर्ण विकास हीच आमची ध्येये आहेत. या राज्यात सध्या सत्तेवर असणाऱ्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सरकारने राज्याची प्रगती कुंठित केली आहे. या राज्याला एका समंजस आणि उत्तरदायित्व स्वीकारणाऱ्या सरकारची आवश्यकता असून भारतीय जनता पक्ष ती आवश्यकता पूर्ण करु शकतो, असे प्रतिपादनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
भाजपला निवडून देण्याचे आवाहन
ड विकास हेच ध्येय असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला निवडण्याचे आवाहन
ड गेल्या 11 वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून पश्चिम बंगाल जनतेला मोठे साहाय्य
ड तृणमूल काँग्रेसच्या संकुचित धोरणांमुळे राज्याचा विकास झाला आहे अवरुद्ध
Comments are closed.