फलंदाजी नव्हे फिरकीचे वादळ घोंगावणार, उपांत्य फेरीचा फैसला करण्यासाठी आज इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात झुंज
पाल्लेकेलेची खेळपट्टी म्हणजे एखादा धूर्त जादूगारच म्हणावा लागेल. चेंडू हातातून सुटतो आणि क्षणात दिशाभूल करतो. अशा संथ, फिरकीला पोषक खेळपट्टीवर आज सुपर एटमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या लढतीत ना फलंदाजांची आतषबाजी होईल, ना वेगवान गोलंदाजांची दहशत दिसेल. इथे फक्त फिरकीचे वादळ घोंगावणार. इथे राज्यही त्यांचेच असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काल श्रीलंकेवर 51 धावांचा दणदणीत विजय मिळवत इंग्लंडने आत्मविश्वास उंचावला आहे. आर्चरच्या वेगाला साथ देत आदिल राशीद आणि लियाम डॉसन यांनी फिरकीचे जाळे इतके घट्ट विणले की, श्रीलंकेचा डाव शंभरीत गुंडाळला गेला. विल जॅक्स हा शांत पण परिणामकारक शिलेदार ठरतोय. बॅटने आणि ऑफस्पिननेही. फिल सॉल्ट फॉर्मात परतलाय; मात्र जोस बटलरला सूर अजूनही सापडलेला नाही. कर्णधार हॅरी ब्रूकही म्हणालाय, आमची सर्वोत्तम फलंदाजी अजून बाकी आहे. हा इशाराच आहे. समजनेवालो को इशाराही काफी होता है.
सध्या कॅण्डी आणि कोलंबोत पाऊस ऑनडय़ुटी आहे. पाकिस्तानची सुरुवातही त्यानेच खुंटवली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो एकटा बरसला आणि फटाक्यांवर पाणी ओतावे तसे खेळपट्टीवर पाणी ओतले. परिणामतः सामना सुरूच झाला आणि गुणही गेला. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी प्रत्येक गुण अमूल्य आहे. संथ होत जाणाऱया खेळपट्टीवर त्यांची खरी ताकद म्हणजे फिरकीची विविधता. अबरार अहमदची गूढ चेंडूफेक, शादाब खानची चपळाई आणि मोहम्मद नवाजची अचूकता, हा पाकिस्तानी ताफा इंग्लंडला जखडू शकतो. फलंदाजीत साहिबझादा फरहान फॉर्मात आहे; पण सईम अयूब आणि कर्णधार सलमान आगा यांना मोठी खेळी करावीच लागेल.
काल सुपर एटच्या दोन्ही लढतीत दुसरा फलंदाजी करणारा संघ शंभरीत कोसळला. फटकेबाजी फारशी दिसली नाही. त्यामुळे कॅण्डीतही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. पावसाचीही कमी शक्यता असली तरी पाऊस आपल्या मनाचा राजा आहे. तो कधीही धडकू शकतो. उभय संघांतील झुंज संयम, चातुर्य आणि वळणांची परीक्षा असेल. एक चुकीचा फटका, एक चुकीचा अंदाज आणि सामना हातातून निसटेल. सुपर-एटच्या या रणांगणावर फिरकीच विजेत्याच्या कपाळावर विजयाची रेष उमटवणार यात शंका नाही.
Comments are closed.