तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय यांचे निधन
कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालचे प्रमुख नेते आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांचे सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी 71 व्या वर्षी साल्ट लेक येथील अपोलो रुग्णालयात पहाटे 1:30 वाजता अखेरचा श्वास घेतला. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत रॉय यांना सर्वोच्च रणनीतीकारांपैकी एक महत्त्वाचे नेते मानले जाते. त्यांच्या निधनाबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
बिघडत्या तब्येतीमुळे मुकुल रॉय अलिकडच्या काळात सक्रिय राजकारणापासून दूर गेले होते. 2023 च्या सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांना डिमेंशिया आणि पार्किन्सन आजाराचे निदान केल्यामुळे त्यांच्या शारीरिक क्षमतांमध्ये लक्षणीय घट झाली होती. मार्च 2023 मध्ये त्यांच्यावर हायड्रोसेफलससाठी मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जुलै 2024 मध्ये घरी पडून डोक्याला दुखापत झाल्यानंतर रक्ताची गुठळी काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली होती. त्यांना दीर्घकालीन मधुमेह, श्वासोच्छवासाच्या समस्या आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची समस्याही जाणवत होती.
मुकुल रॉय यांचा राजकीय प्रवास
मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि ममता बॅनर्जी यांचे सर्वात विश्वासू रणनीतीकार होते. 1998 मध्ये पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांनी संघटना मजबूत करण्यात ‘चाणक्य’सारखी भूमिका बजावली. त्यांनी यूपीए-2 सरकारमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री आणि जहाजबांधणी राज्यमंत्री म्हणून काम केले. 2006 मध्ये राज्यसभेवर निवडून आल्यानंतर 2009 ते 2012 पर्यंत सभागृहात पक्षाचे नेते म्हणून काम केले. दीर्घकाळ राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे सरचिटणीस म्हणून ते दिल्लीत तृणमूल काँग्रेसचा एक प्रमुख चेहरा होते. 2017 मध्ये मतभेदांमुळे ते भाजपमध्ये सामील झाले होते. तथापि, 2021 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ते पुन्हा टीएमसीमध्ये परतले होते.
Comments are closed.