हेड कोच गौतम गंभीरने घेतली अभिषेक शर्माची ‘क्लास’, टी20 वर्ल्डकपमध्ये लयीत परतणार? व्हिडिओ व्हायरल

अभिषेक शर्मासाठी टी२० विश्वचषकाची सुरूवात चांगली झाली नाही. आपल्या स्फोटक शैलीने फलंदाजीला सुरूवात करणारा अभिषेक सलग तीनदा शून्यावर बाद झाला. आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये त्याने ४ सामन्यात खेळताना केवळ १५ धावा केल्या आहेत. भारताचा या स्पर्धेतील पुढचा सुपर-८चा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे. हा सामना २६ फेब्रुवारीला चेन्नईमध्ये खेळला जाणार असून संघ सोमवारी (२३ फेब्रुवारी) चेन्नईमध्ये पोहोचला. चेन्नईमध्ये पोहोचताच भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने अभिषेकचा ‘क्लास’ घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
चेन्नई विमानतळावरून जेव्हा संघाचे खेळाडू बसमध्ये चढले तेव्हा अभिषेक गंभीरपाशी बसलेला दिसला. दोघांमध्ये गंभीरपणे चर्चा सुरू असल्याचे दिसते. हे पाहून प्रशिक्षक गंभीर अभिषेकला महत्वाच्या टिप्स देत आहे असे वाटते. नुकतेच गंभीरने त्याच्याकडून दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याआधीही एक वेगळा सराव करून घेतला होता. अभिषेकने लवकर फॉर्ममध्ये परतावे अशी सर्वाचीच इच्छा आहे.
भारतीय संघाची या स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर वरच्या फळीतील एका तरी फलंदाजाला पुढील सामन्यासाठी बाहेर केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक डावखुरे फलंदाजी आहेत, जे ऑफ-स्पिनचा शिकार होत असल्याने भारताच्या सलामी भागीदारीवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्यांच्या रणनीतीमध्ये बदल करू शकते, याचे संकेत असिस्टंट कोच रियान टेन डोशेट यांनीही दिले आहेत. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या संजू सॅमसन खेळताना दिसेल तर चकित होण्याचे कारण नाही.
याबाबत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सिंताशू कोटक म्हणाले, “जर मुख्य प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापकांना वाटते आपण काही वेगळे केले पाहिजे तर ते करू. त्यामुळे आम्ही काही बदल केले तर ते कोणते आणि कसे असतील यावर विचार करू.”
डोशेटने म्हटले, “संघनिवड करण्यासाठी त्या खेळाडूंनाच निवडले गेले ज्यांनी मागील दीड वर्षात चांगली कामगिरी केली, मग ते धावा करण्यात अपयशी ठरत असो. जर बदल करत संजू सॅमसनला आणले तर चांगलेच आहे. तो एक वरच्या फळीतील उजव्या हाताचा उत्तम फलंदाज असून संघासाठी फायद्याचे ठरेल.”
अभिषेकबरोबर तिलक वर्माही धावा करण्यात अपयशी ठरत आहे. रिंकू सिंगही फिनिशरची भुमिका नीट पार पाडत नाही. त्याने २९ चेंडूत केवळ २४ धावा केल्या आहेत. गतविजेत्याची ही स्थिती पाहून संघ व्यवस्थापनाला लवकरच निर्णय घ्यावे लागणार आहेत.
Comments are closed.