मराठी येत नाही म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक…महाराष्ट्राच्या प्रेमात पडली जपानी तरुणी; अस्खलित मराठी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सोशल मीडियावर सध्या एका जपानी तरुणीचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी अत्यंत उत्साहाने मराठी भाषा शिकताना आणि बोलताना दिसत आहे. तिच्या या प्रयत्नांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, मराठी भाषेप्रती तिने दाखवलेला आदर पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असूनही अनेक अमराठी लोक स्थानिक भाषा शिकण्यास टाळाटाळ करतात. यामुळे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पाहायला मिळतो. आम्ही इथे इतके दिवस राहतो, पण आम्हाला मराठी येत नाही, असे म्हणणाऱ्यांना या जपानी तरुणीने जोरदार चपराक लगावली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या जपानी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

राज ठाकरे पोस्टमध्ये म्हणतात, एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा ‘मराठी’ आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात, नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत.

उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात, असे राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

Comments are closed.