Accident news – नगर-दौंड महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह चालकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नगर-दौंड महामार्गावरील कोळगाव शिवारात मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ट्रक आणि मारुती इको या दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात इको गाडीतील चालकासह इतर तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

नितीन कोकाटे (वय – 22, रा. काष्टी, चालक), गजानन जनार्धन पायघन (वय – 47), दुर्पा गजानन पायघन (वय- 36) आणि वैभव गजानन पायघन (वय – 19) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात करण गजानन पायघन (वय – 13) हा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​पायघन कुटुंबीय मूळचे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथील रहिवासी आहेत. कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावात वास्तव्यास होते. काष्टी येथील चालक नितीन कोकाटे याला घेऊन ते आपल्या मूळ गावी गेले होते. 23 तारखेला रात्री ते पुन्हा चिंभळे येथे येण्यासाठी निघाले होते. मात्र, पहाटे तीनच्या सुमारास कोळगाव शिवारातील माऊली मंदिर परिसरात त्यांची गाडी आली असता, दौंडहून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, इको गाडीचा चक्काचूर होऊन चौघांचा जागीच मृत्यू झाला.

​अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, दादासाहेब क्षीरसागर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीत अडकून पडलेले मृतदेह बाहेर काढले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.