राज्याचा नकाशा ‘सातारा’ जिल्ह्यापाशीच संपतो का? मराठवाड्याच्या पर्यटन उपेक्षेवरून अंबादास दानवे यांची शंभूराज देसाईंवर टीका
राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यपद्धतीवर आणि मराठवाड्याच्या पर्यटनाकडे होत असलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षावर आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राचा नकाशा पर्यटनमंत्र्यांसाठी केवळ सातारा जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे का, असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, अंबादास दानवे यांनी उपस्थित करत सरकारला धारेवर धरले आहे. राज्यातील विद्यमान सरकार स्थापन झाल्यापासून सातारा जिल्ह्यात तालुक्यांच्या संख्येपेक्षाही जास्त महोत्सवांचे आयोजन करून तिथे तब्बल 29 कोटी रुपयांची उधळण करण्यात आली. मात्र, जागतिक वारसा लाभलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील ‘एलोरा फेस्टिव्हल’साठी सरकारने साधी दमडीही दिली नसल्याने मराठवाड्याच्या कला-संस्कृतीचा हा अपमान नाही का असा सवालही दानवे यांनी केला आहे.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई जी, महाराष्ट्राचा नकाशा ‘सातारा’ जिल्ह्यापाशीच संपतो का? सरकार स्थापन झाल्यापासून मराठवाड्याच्या पर्यटनासाठी आपल्याला एकदाही मुहूर्त सापडला नाही!
साताऱ्यात तालुक्यांपेक्षा जास्त महोत्सवांची खैरात आणि २९ कोटींची उधळण, मग जागतिक वारसा स्थळे असलेल्या… pic.twitter.com/5SX3Yj02ko— अंबादास दानवे (@iambadasdanve) 24 फेब्रुवारी 2026
अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करताना म्हटले की, एकीकडे सातारा जिल्ह्यात शासकीय निधीची खैरात सुरू असताना, दुसरीकडे जागतिक नकाशावर स्थान असलेल्या वेरूळ-अजिंठा लेणींच्या जिल्ह्यात पर्यटन महोत्सवाचा मुहूर्त सरकारला अद्याप सापडलेला नाही. पर्यटनमंत्र्यांनी कधीतरी आपल्या जिल्ह्याबाहेर पडून मराठवाड्याच्या पर्यटन क्षेत्राचा आढावा घेण्याचे कष्ट घ्यावेत, असा सणसणीत टोलाही लगावण्यात आला आहे. या संपूर्ण वादात छत्रपती संभाजीनगरचे स्थानिक मंत्रीदेखील टीकेचे धनी ठरले आहेत. स्वतःकडे हजारो कोटींचे बजेट असल्याचे दावे करणाऱ्या या मंत्र्यांनी जिल्ह्याच्या हक्काच्या पर्यटन महोत्सवासाठी नेमकी काय भूमिका बजावली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या भूमीची पर्यटनाच्या बाबतीत होत असलेली ही परवड सरकारचा प्रादेशिक भेदभाव उघड करणारी ठरत असल्याचेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
Comments are closed.