इराणमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून चौघांचा मृत्यू; अणुकेंद्र असलेल्या इस्फहान प्रांतात दुर्घटना
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच इराणच्या इस्फहान प्रांतात लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला आहे. हे हेलिकॉप्टर एका घाऊक फळ मार्केटमध्ये कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, ज्या इस्फहान प्रांतात हा अपघात झाला, तिथेच इराणचा महत्त्वाचा न्युक्लिअर प्लांट असून अपघातानंतर हेलिकॉप्टरचे अवशेष परिसरात विखुरले गेले आहेत. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचे म्हटले असले तरी, या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इराणचा हवाई सुरक्षा रेकॉर्ड अत्यंत खराब असून तिथे वारंवार विमान अपघात होत असल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. इराणकडील अनेक विमाने आणि हेलिकॉप्टर 1979 च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी खरेदी केलेली आहेत. दीर्घकाळ लागू असलेल्या निर्बंधांमुळे या विमानांच्या देखभालीसाठी स्पेअर पार्ट्स उपलब्ध नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. गेल्या आठवड्यातही हमादान प्रांतात प्रशिक्षणादरम्यान अमेरिकन बनावटीचे एक एफ-4 फायटर विमान कोसळून एका पायलटचा मृत्यू झाला होता.
हा अपघात अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असून त्यांनी लष्करी शक्ती वाढवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर इराणी सैन्य सध्या ‘हाय अलर्ट’वर असून, अशा संवेदनशील काळात इस्फहानसारख्या मोक्याच्या ठिकाणी झालेला हा अपघात इराणसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
Comments are closed.