चालकाने मद्यपान केल्यानंतर बस सुरू होणार नाही अशी ‘AI’ ची टेक्नॉलॉजी येणार होती, त्याचं पुढे काय झालं? आदित्य ठाकरेंचा सवाल
राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या (स्लिपर बसेस) मनमानी कारभारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. “चालकाने मद्यपान केले असल्यास बस सुरूच होणार नाही, असे ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, त्याचं पुढे काय झालं?” असा थेट सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “मुंबईतून बाहेर पडणाऱ्या स्लिपर बसेस अतिशय भयानकपणे चालवल्या जातात. हायवेवर हे चालक कोणतेही नियम पाळत नाहीत, लेन डिसिप्लीनचे पालन करत नाहीत. या बसेस बाहेरून पाहिल्या तरी भीती वाटते. वरच्या बर्थवर झोपलेला प्रवासी खाली पडला तर काय होईल, अशी परिस्थिती असते.”
वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर बोलताना त्यांनी प्रशासनाच्या डिजिटल कारवाईवर बोट ठेवले. “आम्ही अनेक वर्षांपासून कडक कारवाई करू असं बोलतोय, पण ती कारवाई प्रत्यक्ष रस्त्यावर होणार आहे का? सीसीटीव्ही आणि डिजिटल दंडाला आता कोणीही घाबरत नाहीये. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर होणारी वाहतूक कोंडी हे या बेशिस्त ड्रायव्हिंगचेच फळ आहे,” असेही ठाकरे यांनी नमूद केले.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “नागपूरमध्ये मंत्री महोदयांनी सांगितले होते की, अशा बसेस येणार आहेत ज्यामध्ये चालक दारू पिऊन बसला तर बस सुरूच होणार नाही. एआय तंत्रज्ञानाचा वापर यात केला जाणार होता. त्या टेक्नॉलॉजीचं पुढे काय झालं? ती प्रत्यक्षात कधी येणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Comments are closed.